दरवर्षी 4000 युवकांना प्रशिक्षित करण्याचा उद्देश असलेल्या कर्नाटक जर्मन टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (केजीटीटीआय) या संस्थेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ आज बुधवारी उद्यमबाग येथे उत्साहात पार पडला.
सदर पायाभरणी समारंभ राज्याचे कौशल्य विकास मंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना त्यांनी ही बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधण्यासाठी 15.5 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्र, रोबोटिक्स वगैरे क्षेत्रांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे कौशल्य युवा पिढीने आत्मसात करावे यावर लक्ष केंद्रित करून केंद्र सरकार 30 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करणार आहे. उत्पादन क्षेत्रात कल्पनेपलीकडे प्रगती झाली आहे. जागतिक उद्योगाची गरज लक्षात घेऊन केंद्र युवकांना प्रशिक्षित करेल, अशी माहिती मंत्री डाॅ. अश्वथ नारायण यांनी दिली.
रोजगार निर्मितीच्या बाबतीत कर्नाटक राज्य एक आश्वासक गंतव्यस्थान बनले आहे. या संधीचा लाभ घेऊन आमच्या युवकांनी उत्तम कौशल्य आत्मसात केले पाहिजे. याचे महत्त्व जाणून राज्य सरकारने केजीटीटीआय सारख्या केंद्रांची स्थापना करण्याला प्राधान्य दिले आहे.
मागील तीन औद्योगिक क्रांतीचा लाभ करून घेण्यात भारताला अपयश आले आहे. तथापी 144 कोटी लोकसंख्येचा आपला देश असल्यामुळे सध्याच्या औद्योगिक क्रांती 4.0 द्वारे निर्माण झालेल्या संधी आपण गमावून चालणार नाही, असे ते म्हणाले.
कर्नाटक ही चांगल्या संधींची भूमी बनली आहे. पूर्वी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. मात्र आता बेंगलोर येथील फक्त दोन कंपन्या देशातील 50 टक्के म्हणजे अर्ध्या स्टाॅक मार्केटची सूत्र हलवतात असे सांगून राज्यातील फिनटेक कंपन्या येत्या 5 वर्षात आर्थिक सेवा हाताळण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील.
त्याचप्रमाणे राज्यातील कंपन्या भविष्यात शिक्षण, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि त्यासारख्या अन्य क्षेत्रातही आघाडीवर राहतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण यांनी व्यक्त केला.