शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील प्रज्वल शिवानंद करीगार या शालेय विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवाजीनगरसह समस्त शहरवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि शिवाजीनगर येथील पंच महादेव पवार तसेच इतर पंच मंडळींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून येत्या दोन दिवसात खुन्यांना गजाआड करून कठोर कलमांद्वारे त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाईल असे आश्वासन दिले. निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा अत्यंत निर्घृण खून करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
बेळगाव शहरात सध्याचे खुनासारखे प्रकार सुरू आहेत ते कोणत्या माध्यमातून सुरू आहेत याचा गांभीर्याने विचार केला जावा. सध्याची परिस्थिती पाहता शहरातील शाळा -महाविद्यालयांसभोवती नशिल्या अंमली पदार्थांचा विळखा पडत आहे. अंमली पदार्थ विक्रीचे जाळे समोर नष्ट केले गेले पाहिजे. कारण शहरात घडणारे खुनाचे प्रकार हे नशेच्या भरातच होत आहेत. पटकन एखाद्याचा खून करणे साध्य नाही.
आपण सर्वजण गेली 50 -60 वर्षे बेळगाव शहरात राहतो. या ठिकाणीच आपला जन्म झाला. मात्र यापूर्वी असे कधी घडले नव्हते. या पद्धतीने दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने अल्पवयीन मुलाचा खून होत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. सर्वप्रथम सर्व पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आणि संबंधित भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली मुलं काय करतात? कुठे जातात? ती कशी वागतात? यावर लक्ष ठेवून आपला परिसर सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी असे सांगून यापूर्वी परराज्यातील अशा घटना आपल्या कानावर येत होत्या. मात्र आता बेळगाव सारख्या शांत शहरात दिवसाढवळ्या खून होत आहेत.
याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रज्वलच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करून कठोर शासन करावे अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे, असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले. याप्रसंगी शिवाजीनगर येथील पंचमंडळी चिगरे गुरुजी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर,विनायक बावडेकर,विजय पवार ,महेश लाड,राजू खटावकर नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.