देशातील अन्य शहरांसह प्रामुख्याने पुणे, बेंगलोर व मुंबई येथे स्थायिक असलेले बेळगावकर दिवाळीसाठी हमखास गावी परततात. नेमके हेच हेरून कांही खाजगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट सुरू केली असून दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी आराम बसेसच्या भाड्यात जवळपास भरमसाठ अव्वाच्यासव्वा वाढ करण्यात आली आहे.
यंदा धनत्रयोदशीने 22 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबे आणि युवक कामासाठी पुणे मुंबईला स्थायिक आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण कर्नाटकातील अनेक लोक शासकीय सेवा आणि इतर कामांसाठी बेळगावात स्थायिक आहेत.
दिवाळीसाठी घराकडे परतण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू झाली आहे. रेल्वे, विमान, बस यांचे आरक्षण केले जात आहे. रेल्वेचे बुकिंग तर दोन महिने आधीच फुल्ल झाले आहे, तर राज्य परिवहन मंडळाच्या बसेस देखील फुल्ल असल्याने अनेकांना खाजगी बस सेवेचा आधार घ्यावा लागत आहे.
दिवाळीसाठी पाच दिवसांची सुट्टी काढून प्रवासी मोठ्या संख्येने आपापल्या गावी परतत असल्याचा गैरफायदा घेत कांही खाजगी बस वाहतूकदारांनी नेहमीप्रमाणे तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यांच्याकडून इतर वेळी 800 ते 1200 रुपये इतका असणारा तिकिटाचा दर सध्या 3000 ते 3500 रुपये इतका आकारला जात आहे. अन्य कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
साधारण सणाच्या काळात बसचे भाडे वाढवले जाते. मात्र यावेळी सणासुदीच्या काळात सरकारी बससह कोणत्याही बसचे भाडे वाढवू नये असा इशारा सरकारने दिला होता. मात्र सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत खाजगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. यामुळे प्रवासीवर्गात संताप व्यक्त होताना दिसत आहे.