ऐन दिवाळीत आज अमावस्या दिवशी खंडग्रास सूर्य ग्रहण आले आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये ग्रहण काळात देवाचे दर्शन घेण्याची मुभा आहे. ग्रहणानिमित्त सध्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी सुरू आहेत.
बेळगावमध्ये ग्रहणाचे वेध लागण्याची वेळ ५ वाजून ११ मिनिटांची असून, ग्रहणाची मधली वेळ ५ वाजून ५० मिनिटं ही आहे. तसेच ग्रहण संपण्याचा कालावधी संध्याकाळी ६ वाजून 28 मिनिटांनी आहे. बेळगावच्या कपलेश्वर मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे ग्रहणानिमित्तची पूजाअर्चा चालू आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपलेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाला रुद्राभिषेक केला जात आहे.
दुपारी ४ ते ६.३० या वेळेत महामृत्युंजय जपाला सुरुवात झाली आहे. सूर्य ग्रहण काळात पुजारी शिवलिंगाला बेलपत्रांसह पूर्णपणे झाकून ठेवतात. ग्रहण काळात भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास कोणतीही बंदी नाही. भक्तांना मंदिरात येऊन दर्शन घेण्यास व महामृत्युंजय जपामध्ये सहभागी होण्याची मुभा आहे. ग्रहणा नंतर मंदिराची स्वच्छता करून विशेष पूजा केली जाते. त्यानुसार आज ती केली जाईल.
सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिरात देखील ग्रहणानिमित्त नेहमीप्रमाणे पूजा सुरू आहे. सौंदत्तीमध्ये ग्रहण चालू होण्याचे वेध लागण्याची वेळ ४ वाजून २४ मिनिटांनी आहे. ग्रहणाची मधली वेळ ५.२७ मिनिटांनी आहे, तर ग्रहण संपण्याचा कालावधी ६ वाजून २५ मिनिटांनी आहे. ग्रहण काळात सौंदत्ती यल्लमा मंदिर प्रवेश करण्यासाठी भाविकांना कोणतीही बंदी नाही.
ग्रहण संपल्या नंतर दररोज संध्याकाळी ४.३० वाजता जी पूजा केली जाते, ती पूजा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रहण संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटानंतर संपूर्ण मंदिराची स्वच्छता करून यल्लमा देवीची विशेष पूजा केली जाणार आहे.
चिक्कोडीमध्ये ग्रहणाचे वेध लागण्याची वेळ ४ वाजून ४९ मिनिटांची आहे. ग्रहणाची मधली वेळ ५ वाजून ४३ मिनिटांची असून, ग्रहण समाप्तीची वेळ ६ वाजून २७ मिनिटांनी आहे, चिक्कोडीचे महादेव मंदिर हे ग्रहण काळात खुले राहणार आहे. ग्रहण संपल्या नंतर तेथे सुद्धा मंदिराची संपूर्ण प्रकारे स्वच्छता करून विशेष पूजा केली जाणार आहे. अथणी येथील कोकटनूर येथील यल्लमा देवी मंदिरात सुद्धा दर्शनासाठी कोणतेही बंधन नाही, ग्रहण पूर्ण झाल्यानंतर कृष्णा नदीचे पाणी आणून स्वच्छता करून पूजा केली जाणार आहे. चिंचली येथील मायाक्का देवी मंदिरात सुद्धा ग्रहणानिमित्त नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा चालू आहे.