बेळगावात लवकरच ग्लोबल इमर्जिंग टेक्नॉलॉजी डिझाईन सेंटरची (जीइटीडीसी) स्थापना होणार असून या सेंटरच्या निर्मितीसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनकडून (केडीइएम) बेळगावातील डिझाईन सेंटरची उभारणी केली जाणार आहे तांत्रिक क्षेत्राचा विकास आणि आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी बेळगाव मध्ये डिझाईन टेक्नॉलॉजीची स्थापना केली जावी अशी मागणी होती. याखेरीज स्थानिक आमदार आणि तज्ञांनी बेळगाव दौऱ्यात उच्च शिक्षण मंत्री अश्वत नारायण यांचे या प्रस्तावाकडे लक्ष वेधले होते.
त्याची दखल घेऊन सेंटर उभारणीचा हा प्रस्ताव त्यांनी पुढे आणून निधीची तरतूद केली आहे. ग्लोबल इमर्जिंग टेक्नॉलॉजी डिझाईन सेंटर हे एरोस्पेस, डिफेन्स, ऑटो, ऑटो कंपोनंट, ईव्ही, बायो टेक्नॉलॉजी (बीटी), फार्मा अँड मेडिकल डिव्हाईस, सेमीकंडक्टर, टेलिकॉम, ईएसडीएम, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आदी सेक्टरसाठी पोषक व विकासाला उपयुक्त ठरणार आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 2022 -23 सालचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी ग्लोबल इमर्जिंग टेक्नॉलॉजी डिझाईन सेंटरची निर्मिती बेळगावमध्ये करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आता सदर सेंटर उभारणीची कार्यवाही सुरू झाली असून पात्र ठेकेदारांची निवड निविदेच्या माध्यमातून केली जात आहे.
बेळगाव आणि हुबळी -धारवाड जिल्ह्यात औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीसाठी विविध प्रकल्प स्थापण्यात येत आहेत, त्याचाच भाग म्हणून डिझाईन केंद्राची स्थापना बेळगावात केली जात आहे. रोजगाराच्या विपुल संधी या योजनेमुळे प्राप्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.