अज्ञातांनी शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन शेतात गवत कापणाऱ्या ग्रा. पं. सदस्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना बड्डेबैल (ता. खानापूर) येथे घडले.
ग्रामपंचायत सदस्य सूर्याजी पाटील (वय 38) व संदीप पाटील (वय 32) अशी जखमींची नावे आहेत. गावाजवळील शेतात गवत कापत असताना शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्बला सूर्याजी यांचा विळा लागला.
त्यामुळे मोठा स्फोट होऊन त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे व अंगठा निकामी झाला. तसेच बॉम्बमध्ये भरलेले खिळे आणि लोखंडी चुरा त्यांच्या शरीरात घुसून जखमा झाल्या.
बॉम्बस्फोटात जवळच गवत कापत असलेल्या संदीप यांनाही किरकोळ दुखापती झाल्या. या दोघांनाही उपचारासाठी तातडीने बेळगावातील खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.
नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी जवळपास 20 -25 जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत.
वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब बनविल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून तपास हाती घेण्यात आला आहे.