शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अद्याप ऊस दराची घोषणा करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे गेल्या 15 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रति टन ऊसाला 5500 रुपये इतका दर द्यावा, अशी मागणी आहे. या संदर्भात गेल्या कांही दिवसांपासून सरकारच्या पातळीवर आणि साखर आयुक्तांसमोर चर्चा होऊन देखील अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे नेते राघवेंद्र नायक, गणेश इळीगेर, शिवानंद मुगळीहाळ, प्रकाश नायक आदींच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी सुवर्ण विधानसौध येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
मात्र पोलिसांनी आंदोलन करण्यास मज्जाव करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक करून एपीएमसी पोलीस ठाण्यात आणून डांबले. तत्पूर्वी हत्तरगी येथील हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे पहावयास मिळाले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी राज्य सरकारचा कडाडून निषेध केला. आम्ही न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आम्हाला अटक करून सरकारने प्रतिकूल कृती केली आहे. सरकारच्या या वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो. निवडणुका जवळ येत आहेत हे नेते मंडळींनी लक्षात ठेवावे.
उसाच्या दराबाबतीत योग्य निर्णय द्या अन्यथा शेतकरी तुमचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना किंमत द्या, लोकशाहीचा आदर करा अशी माझी विनंती आहे. लोकशाही मार्गाने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज अशा पद्धतीने पोलीस बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करू नये. आपण शेतकऱ्यांनी पिकविलेले अन्न खातो याची जाणीव सरकारने ठेवावी आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा सध्या असंघटित असलेले शेतकरी संघटित झाले तर सरकारला ते जड जाईल, असा इशाराही प्रकाश नायक यांनी दिला.
शिवानंद मुगळीहाळ यांनी देखील राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा धिक्कार केला. ऊस दराच्या बाबतीत सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने तसेच शेतकऱ्यांचा हिरमोड केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
ऊस दरासाठी बेळगावातील शेतकरी आक्रमक-सुवर्ण सौध समोर जोरदार आंदोलन-आंदोलन शेतकरी आणि पोलिसांत बाचाबाची https://t.co/vtNR9vhGuK pic.twitter.com/nL4dyUfznZ
— Belgaumlive (@belgaumlive) October 21, 2022