दीपावली हा सण प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. आसमंत उजळवणाऱ्या या सणाची आज वसुबारसने सुरुवात होत असून दिवाळीचे येणारे पाचही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. थोडक्यात जाणून घेऊया या पाचही मंगलमय दिवसांचे महत्त्व.
1) वसुबारस -अश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गाईचे वासरू. या दिवशी सायंकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा करण्याची प्रथा आहे.
गाईच्या पायावर पाणी घालून हळदी-कुंकू लावून पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य गाईला अर्पण करून घरासमोर सुरेख रांगोळी रेखाटण्याद्वारे पणत्या लावून विद्युत रोषणाई करून दीपावलीचा आरंभ होतो.
2) धनत्रयोदशी -दिवाळी उत्सवाच्या या दिवशी घर स्वच्छ साफसफाई करून सजवलं जातं. दारात रांगोळी व उंबऱ्यात पणती लावून पारंपारिक पद्धतीने धन ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते. या दिवशी रात्रभर दिव्यांची आरासही केली जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे म्हणूनच सगळे वेद व उपनिषद् हेच सांगतात की तुम्ही सारे प्रकाशमान आहात.
तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहे तर कोणी प्रकाशित व्हायचा आहे, पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो अंधकार मिटवण्यासाठी केवळ एक व्यक्ती पुरेशी नाही त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. म्हणूनच प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो जर कुणा बद्दल मनात काही अढी ताण असेल तर फाटक्या सारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी प्राचीन काळी लोक आपले सारे धन देवासमोर पसरवून ठेवत व समृद्धीचा आनंद घेत होते.
3) नरक चतुर्दशी -दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी भल्या पहाटे उठून स्नान आदी सर्व कार्य आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. या सणाबद्दल एक पुरातनकथा आहे असुरांचा राजा नरकासुर दक्षिण प्रांतात राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर त्याने देवांची माता अदिती हिची सुंदर कर्ण कुंडल हिसकावून घेऊन देव आणि संतांच्या 16000 कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवल्या होत्या.
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी या नरकासुराचा वध करून त्याने डांबून ठेवलेल्या या सर्व कन्यांची मुक्तता केली. तसेच आधी माता अदिती हिची कर्ण कुंडल परत प्राप्त केली. त्या मुक्त महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणूनच प्रात:स्नानाची हि परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यत्वाचा विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजन- दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्वाचा असून त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. ज्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो, अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख दूर सारला जातो. लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी सर्वप्रकारे आरास करून लक्ष्मीपूजन केले जाते व सर्वांना मिठाई वाटून आनंद साजरा केला जाता. समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते. ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात त्या प्रमाणे दिव्यत्वाची सुद्धा वेगवेगळी रूपे असतात आणि म्हणूनच लक्ष्मीपूजन केले जाते.
4) पाडवा -अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर बाल प्रतिपदा अर्थात हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी सायंकाळी घरोघरी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. नवविवाहीत जोडप्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. याला पहिला दिवाळसण म्हणतात. या दिवशी जावयाला सुद्धा आहेर दिला जातो.
5) भाऊबीज -कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करून घेतो. बहिण आपल्या भावाचे स्वागत गोडधोड पदार्थाने करते. भाऊ बहिणीला प्रेमाने ओवाळणी देतो. त्यामुळे भाऊबीजेला आपल्या इकडे खूप महत्त्व आहे. अशाप्रकारे दीपावलीचे हे 5 मंगलमय दिवस मोठ्या थाटात उत्साहाने झगमगाटात साजरे केले जातात.