आरपीडी क्रॉस आणि जुन्या धारवाड रोडच्या नामकरणानंतर आता बेम्को क्रॉस -केएलई इंजीनियरिंग कॉलेज रस्ता ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नांव देण्याची तयारी करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही बेळगाव महापालिकेने तयार केला असून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.
शहरातील आणखी एका रस्त्याचे आता नामकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी जुना धारवाड रोड म्हणजे पिंपळकट्टा ते हालगा रस्त्याला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे नांव देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण आणि विकास झाला असला तरी या रस्त्यावर सातत्याने पाणी तुंबत असल्याने तो बदनाम होऊ लागला आहे.
या रस्त्यानंतर आरपीडी क्रॉसचे नव्याने नामकरण करण्यासाठी प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र आरपीडी चौकाच्या नामकरणास विविध संस्था आणि नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
त्या मागोमाग आता बेम्को क्रॉस ते केएलई इंजिनिअरिंग कॉलेज मार्गाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई असे नामकरण करण्याचा प्रस्ताव बेळगाव महापालिकेने तयार केला आहे. या संदर्भात सूचना, आक्षेप – लिखित तक्रारी मांडण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या कालावधीत योग्य सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत येणाऱ्या हरकती व सूचना लक्षात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.