बेळगाव न्यायालय आवारामध्ये अलीकडे भिक्षुकांचा वावर वाढला असून या वैताग आणणाऱ्या भिकाऱ्यांचा संबंधित खात्याने तात्काळ बंदोबस्त करून वकील मंडळींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव न्यायालय आवारात वकील, त्यांचे अशिल, साक्षीदार आणि सर्वसामान्य नागरिकांचा दिवसभर मोठा वावर असतो. या सर्वांना सध्या भिकाऱ्यांची धास्ती वाटू लागली आहे. कारण अलीकडे न्यायालय आवारात भिकाऱ्यांची संख्या वाढली असून भीक देण्यास नकार दिला तरी ते एखाद्याची पाठ सोडत नाहीत. त्यांच्या या कृतीमुळे प्रत्येक जण वैतागून गेला आहे.
या भिकाऱ्यांमध्ये कांही महिलांचाही समावेश आहे. भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणे गुन्हा आहे. मात्र न्यायालय आवारात वावरणाऱ्या भिकारी महिला काखेत लहान मूल घेऊन बिनदिक्कत भिकेची याचना करत वकील मंडळींसह सर्वांचाच पिच्छा पुरवत असतात.
सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित खात्याने न्यायालय आवारात वावरणाऱ्या भिकाऱ्यांचा तात्काळ योग्य तो बंदोबस्त करावा. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता (व्हिजिलन्स) पथकाने भिकेसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्या महिला भिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्या निष्पाप लहान मुलांना बाल कल्याण गृहात दाखल करून त्यांचे भविष्य उज्वल करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.