सरकारी कामकाजाबाबत शंभर पैकी नव्यान्नाऊ टक्के कामकाजावर नेहमीच तक्रारी येत असतात..अपवाद वगळता अनेक सरकारी कर्मचारी सर्वसामान्य जनतेच्या रोषाचे कारण बनतात. बेळगावमध्ये आज अशाच पद्धतीची तक्रार पुढे आली आहे.
देसूर रेल्वे स्थानकापासून गणेशपूर येथील गोदामात नेण्यात येत असलेल्या तांदळाच्या गाडीतून तांदूळ पडून नासाडी होत असल्याची बाब पुढे आली आहे. हि बाब सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्या लक्षात आली. तांदूळ गाडीतून सांडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर ट्रकचालकाला याबाबत माहिती दिली.
परंतु ट्रकचालकाने याबाबत दुर्लक्ष करत गाडी तशीच पुढे चालू ठेवली. यादरम्यान रस्त्यावरून तांदूळ पडून नासाडी झाला. यावेळी संतोष दरेकर यांनी सदर ट्रकचा पाठलाग करत कॅम्प परिसरात हि बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालकाला जाब विचारत सांडत असलेल्या तांदळाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना दिली. आणि अखेर नासाडी होत असलेला तांदूळ नासाडी होण्यापासून रोखला गेला.
एकीकडे गरिबांना अन्न मिळावे यासाठी रास्त दरात अन्नधान्य वितरण सरकार करत आहे. बीपीएल रेशन कार्ड च्या माध्यमातून तांदूळ वाटप होत आहे. परंतु या तांदळासंदर्भात अनेक बातम्या पुढे येत असतात. कधी गोदामात बेकायदेशीरपणे साठवण्यात येत असलेला तांदूळ तर कधी बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येत असलेला तांदूळ.. या अशा प्रकारांमुळे ज्या लाभार्थ्यांपर्यंत तांदूळ पोहोचणे गरजेचे आहे त्या लाभार्थ्यांपर्यंत तांदूळ पोहोचत नाही. हा तांदूळ ऊन-पावसात सहा महिन्याहून अधिक कालावधीपर्यंत शेतकरी कष्टाने पिकवतो.
उपासमार आणि शेतकऱ्यापेक्षा एक शीत भाताची किंमत अधिक कुणाला माहित असेल? मात्र अशा परिस्थितदेखील आज झालेल्या प्रकारात ट्रकचालकाचा बेदरकारपणा आणि यामुळे नासाडी झालेला तांदूळ हि बाब दुर्दैवी अशीच आहे. आज कित्येक लोकांना एकवेळचे अन्न देखील मिळणे मुश्किल आहे.
अशा लोकांसाठी सरकार तांदूळ पुरवठा करत असून गरजू लोकांपर्यंत त्यांच्या हक्काचा तांदूळ पोहोचणे अधिक गरजेचे आहे. अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संतोष दरेकर यांच्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने सजग राहणे गरजेचे आहे.