बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या राजकारणाचे वारे हे नेहमीच चारीबाजूंनी वाहतात. एखाद्यावेळी वादळी वाऱ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीचे बेळगावच्या राजकारणाचे वारे सध्या हीन पातळीवर येऊन ठेपले आहेत. विरोधकांवर टीका असो किंवा नैसर्गिक आपत्तीत भरडले जाणारे नुकसानग्रस्त असोत, धार्मिक, शैक्षणिक बाब असो किंवा महागाई अशा अनेक विषयांवर एकमेकाला टार्गेट करून आता राजकारण्यांनी आपला मोर्चा बेळगावात दडलेल्या बिबट्याकडे वळविला आहे.
अन्न-पाण्याच्या शोधात बेळगावच्या गोल्फ कोर्स मैदानात अडकलेला बिबट्या आता राजकारण्यांचे ऐवज बनला आहे. दुर्मिळ होत असलेल्या प्रजातींना वाचविण्यासाठी वनविभागाकडून रात्रंदिवस शोधकार्य सुरु आहे. या शोधकार्यात वन्यपरिसर, झाडी, आसपासच्या परिसरातील गोंगाट, दीडशहाण्या नेटकऱ्यांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवा! यासह अनेक आव्हानांना पेलत वनविभाग शोधकार्य करत असून आता राजकीय गोष्टींचाही अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गोल्फ कोर्स मैदान परिसरात घातलेला धुमाकूळ, काँग्रेस नेत्यांची बिबट्यावरून सुरु असलेली टीकेची मालिका, याला प्रत्त्युत्तरादाखल वनविभाग मंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया यावरून बेळगावचे राजकारण खालच्या स्तराला जात असल्याचे निदर्शनात येत आहे.
राजकारण्यांची हि वृत्ती कुणाला माहीत नसते असे नाही, परंतु राजकारणी लोकांच्या नादी न लागता केवळ आपले मनोरंजन करवून घेण्यात जनताही व्यस्त आहे. मात्र हीच जनता एखाद्या राजकारण्याच्या निमित्ताने आपल्यासारख्याच इतर जनतेला त्रासात अडकवते हि बाब कुणाच्याच लक्षात येत नाही. राजकीय पक्ष आणि त्यांचे झेंडे मिरवणाऱ्या भोळ्याभाबड्या जनतेला आपला किंवा समाजाचा यत्किंचितही विचार कधी येत नाही.
सध्याच्या बेळगावमधील बिबट्या शोध मोहिमेवरून सुरु झालेल्या ‘ड्रामा’ वरून देखील हीच बाब निदर्शनाला येत आहे. कसोशीने प्रयत्न करणाऱ्या वनविभागाच्या शोधकार्यात अशापद्धतीने राजकारण आणून आपल्यासारख्याच इतर नागरिकांचे आपण नुकसान करत आहोत, हि बाब ना राजकारण्यांच्या लक्षात येत आहे आणि ना ही त्यांचे झेंडे मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या! आपल्या या चुकीमुळे या परिसरातील नागरिकांचे, या परिसरात असलेल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कशापद्धतीने नुकसान होत आहे याचे भान देखील या राजकारण्यांना असेल असे वाटत नाही.
बेळगावमध्ये रंगलेले राजकारण्यांचे बिबट्या नाट्य आता थांबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून भानावर येणे गरजेचे आहे. बेळगावमध्ये निर्माण झालेली बिबट्याची समस्या वनविभाग नक्कीच आपल्या प्रयत्नातून सोडवतील. याकडे राजकारणी आणि तथाकथित कार्यकर्त्यांनी नाक न खुपसता इतर नागरी समस्यांकडे आपला मोर्चा वळवून बेळगावचा विकास कशापद्धतीने करता येईल, याकडे लक्ष द्यावे, हीच बाप्पाचरणी प्रार्थना!