यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेमध्ये 625 पैकी 625 गुण संपादन करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील 10 सर्वात प्रतिभावंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6 आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 4 विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साधनेची जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.
याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेऊन घवघवीत यश संपादन करणारे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील टिळकवाडी, बेळगाव येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी अमोघ कौशिक, केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलचा व्यंकटेश डोंगरे, खानापूर नंदगड येथील संगोळ्ळी रायान्ना स्मृती निवासी शाळेची विद्यार्थिनी स्वाती तोलगी, रामदुर्गच्या केंब्रिज इंग्लिश मीडियम हायस्कूलचा आदर्श हलभावी आणि रामदुर्ग लक्ष्मीनगर बसवेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा रोहन गौडर तसेच सौंदत्ती सत्यगिरी येथील कर्नाटक पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सहना रायर हे उपस्थित होते.
यांच्यासमवेत चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील हारुगिरी (ता. रायबाग) येथील भगवान आंग्ल माध्यमिक शाळेची सृष्टी पत्तार, एकसंबा (ता. चिक्कोडी) येथील मोरारजी देसाई शाळेचा शंभू खंणले, भोज तालुका निपाणी येथील न्यू सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी वर्षा पाटील, अथणी विद्यावर्धक इंग्रजी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी विवेकानंद होन्याळी हे देखील हजर होते.
शिक्षणामुळेच जीवनात यशस्वी होता येते. विद्या, विनय आणि श्रद्धा या गोष्टी विद्यार्थ्यांना देशाचे भावी समर्थ नागरिक बनविण्यात महत्वाची भूमिका निभावत असतात हे ध्यानात ठेवा असे सांगून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, विद्यार्थ्यांचे पालक, संबंधित शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित होते.