”विंग्स इंडिया -2022′ या आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी हवाई उड्डाण सोहळ्याला गुरुवारी हैदराबादमध्ये प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यात सुमारे 125 आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी प्रदर्शकांसह 15 देश आणि भारताच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. बेळगावचा एक होतकरू वैमानिक या सोहळ्यात स्वयंसेवकांची भूमिका बजावत आहे हे विशेष होय.
हैदराबाद येथे आयोजित ‘विंग्स इंडिया -2022’ सोहळ्यामध्ये तेलंगणा सरकार, आंध्र प्रदेश सरकार, हरियाणा सरकार आणि मध्यप्रदेश सरकारसह सीएसआयआर -नॅशनल एरोस्पेस लॅबरोटरीज, एअरबस, एम्ब्रॅर, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, पवन हंस, प्रॅट अँड व्हाईटनी, रोल्स रॉयस, टर्बो एव्हिएशन आदी प्रदर्शकांचा सहभाग आहे.
या सोहळ्याचे औचित्य साधून सीएसआयआर -एनएएल आणि सायनटेक टेक्नोलॉजी यांनी आपापसात मल्टी -काॅप्टर ड्रोन्स सारख्या तंत्रज्ञानाच्या देवान-घेवाण करारवर स्वाक्षऱ्या देखील केल्या. नागरी उड्डाण मंत्रालयातील विविध खात्याचे अधिकारी, पॉलिसी मेकर्स, ग्लोबल एक्सपर्ट्स, कॉर्पोरेट लीडर्स आणि इतर भागधारकांनी विंग्स इंडिया -2022 च्या पॅनल चर्चेत सहभाग दर्शविला. विमान वाहतूक वित्तपुरवठा आणि भाडेपट्टी या विषयावर ही पॅनल चर्चा झाली.
विंग्स इंडिया -2022 या सोहळ्यात विविध विमान चालन प्रशिक्षण संस्थांचे अर्थात एव्हिएशन अकॅडमीचे होतकरू वैमानिक स्वयंसेवकांची भूमिका बजावत आहेत. या सोहळ्यात आशिया खंडातील सर्व प्रकारची विमाने प्रदर्शनार्थ मांडण्यात आली असून जगभरातील 15 ते 20 लाख लोक या सोहळ्याला भेट देत आहेत.
सौरभ नरसे हा बेळगावचा सुपुत्र व्यावसायिक परवानाधारक वैमानिक बनण्यासाठी हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत आहे. पुढील वर्षापर्यंत त्याला अधिकृत वैमानिकाचा दर्जा मिळणार आहे. सौरभ देखील या सोहळ्यामध्ये स्वयंसेवकांची भूमिका बजावत आहे. बेळगावचे माजी रणजी क्रिकेटपटू प्रवीण नरसे यांचा तो नातू आहे. सौरभ हा तेलंगणा एव्हिएशन अकॅडमी हैदराबाद येथे वैमानिक प्रशिक्षण घेत आहे.