एका घरात शस्त्रास्त्रासह दहशतवादी लपून बसलेले असतात. नागरिकांना ओलीस ठेवलेले असते. त्या ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणे सोपे नसते. सारे जण आता पुढे काय होणार म्हणून श्वास रोखून पाहत असतात. अचानक तेथे जांबाज कमांडो अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दाखल होतात आणि अत्यंत नियोजनबध्दरित्या हालचाल करून दहशतवाद्यांना जेरबंद करून ओलीस ठेवलेल्याची सुखरूप सुटका करतात, युद्धसदृश्य हे थरारक दृष्य बुधवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या रोहिडेश्वर कॅम्प येथे पत्रकारांना पाहायला मिळाले .
बेळगावात भारत आणि जपान सैनिकांचा ‘एक्स धर्मा गार्डियन -2022’ हा संयुक्त लष्करी कवायत अर्थात युद्धभ्यास सुरू आहे. मात्र यापूर्वी आयोजित केलेल्या संयुक्त युद्धाभ्यासापेक्षा या वेळेचा युद्धाभ्यास वेगळा होता. एक्स धर्मा गार्डियन 2022 युद्धाभ्यासामध्ये आपत्तीजनक परिस्थिती हाताळण्यासाठी सशस्त्र दलांच्या कौशल्य आणि हुशारी बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाऊ शकतो हे दाखवून देण्यात आले. आज बुधवारी त्याचा मुख्य दिवस होता.
ओलिसांच्या रेस्क्यू ऑपरेशनचे अर्थात सुटकेच्या मोहिमेचे प्रात्यक्षिक सुमारे 15 कि. मी. परिसरातील स्थळांची दृश्य कैद करणाऱ्या ड्रोन कॅमेरा पद्धतीच्या मिनी हेलिकॉप्टर कॅमेराने झाली. आकाशात भरारी घेतलेल्या या मिनी हेलिकॉप्टर कॅमेराने रोहिडेश्वर कॅम्प परिसरातील दृश्य एकापाठोपाठ एक टिपण्यास सुरुवात केली. त्यामध्ये जवळपास 5 दहशतवादी आणि दोन ओलीस व्यक्ती कैद झाल्या. त्यानंतर 15 बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांसह 30व्या इन्फंट्री रेजिमेंट ऑफ जापनीज ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सेसच्या सैनिकांना दहशतवादी व ओलीस आढळून आलेल्या जागेपासून 6 कि. मी. अंतरावर हेलिकॉप्टरमधून ड्रॉप करण्यात आले. दोन्ही देशाच्या सैनिकांच्या हातात त्यावेळी अत्याधुनिक शस्त्रे होती. या सैनिकांनी तुकड्यांनी विखरून जेथे पोलिसांना ठेवण्यात आले आहे अशी माहिती मिळाली त्या ब्लॉक नं. 2 ला गराडा घातला. या ब्लॉकच्या आसपासच्या या परिसराची कसून तपासणी केल्यानंतर दोघ सैनिक पहिल्या मजल्यावर चढून गॅलरीत दाखल झाले आणि क्षणाचा विलंब न लावता दरवाजा स्फोटकाने फोडून त्यांनी आत प्रवेश केला. ब्लॉकचा वरचा दरवाजा स्फोटकाने फोडून सैनिकांनी आत प्रवेश केला हे दहशतवाद्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच सैनिकांच्या दुसऱ्या तुकडीने मुख्य दरवाजा फोडून आत प्रवेश करताना दहशतवाद्यांवर हल्ला चढविला. सदर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एक सैनिक जखमी झाला आणि 5 दहशतवादी मारले गेले.
या ऑपरेशननंतर रिमोटद्वारे नियंत्रित एक निस्तब्ध इलेक्ट्रिक वाहन घटनास्थळी पोहोचले आणि त्याने जखमी जवानाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. दरम्यान सशस्त्र सैनिकांच्या तुकड्यांना अद्याप अन्य चार ब्लॉक्सची तपासणी करून तेथे आणखी दहशतवादी लपलेले नाहीत ना याची शहानिशा करावयाची होती. यासाठी प्रारंभी एक खास ड्रोन वापरून पहिल्या ब्लॉकमध्ये कोणीही नाही याची खातरजमा करून घेण्यात आली. मात्र सदर ड्रोनने आसपासची दृष्य टिपताना दोन ठिकाणे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून देऊन सैनिकांना सावध केले. सैनिकांनी सावधगिरीने संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता एका जागी मशीनगन दडवून ठेवलेली आढळून आली, तर दुसऱ्या जागी एक बॉक्स आढळून आला. तो बॉक्स पाहून सैनिकांना बॉम्ब निकामी करणाऱ्या तज्ञांना पाचारण करावे लागले. तज्ञ घटनास्थळी दाखल होईपर्यंत रिमोटच्या सहाय्याने कार्य करणारे मशीन मागून त्या मशीनद्वारे तो बॉक्स एका खड्ड्यात ठेवण्यात आला जेणेकरून यदाकदाचित स्फोट झाल्यास त्यामुळे कोणालाही इजा होऊ नये. सदर बाॅब नंतर निकामी करण्यात आला. तसेच सुटका करण्यात आलेल्या ओलिसांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
सशस्त्र सैनिकांच्या तुकड्या त्यानंतर तिसऱ्या ब्लॉगच्या ठिकाणी पोहोचल्या त्याठिकाणी ब्लॉकचा अंतर्भाग तपासण्यासाठी त्यांनी ज्याला स्मार्ट स्पीरीकल रोबोट म्हंटले जाते अशा थ्रो बॉल कॅमेराचा वापर केला. हा बाॅक रिमोट कंट्रोलद्वारे 150 मीटर त्रिज्येमध्ये फिरून 360 अंशाच्या कोनातील दृश्यं टिपू शकतो. पुण्याच्या कॉम्पॅक्ट रोबोटिक इंडिया प्रा. लि. या कंपनीने याची निर्मिती केली आहे. बाॅल कॅमेराने तिसऱ्या ब्लॉकमध्ये कोणीही नसल्याची खातरजमा केल्यानंतर ब्लॉक नं. 4 चा मुख्य दरवाजा उघडण्यासाठी अत्याधुनिक स्फोटकांचा वापर करण्यात आला. या ब्लॉकमध्ये देखील कोणीही आढळून आले नाही. शेवटचा पाचवा ब्लॉक तपासण्यासाठी श्वान पथकाचा वापर करण्यात आला आणि सर्व कांही ठीक असल्याची खातरजमा सैनिकांनी करून घेतली.
सदर प्रात्यक्षिकानंतर भारत आणि जपान या दोन्ही देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आपत्ती काळात उभय देशांच्या सशस्त्र दलांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या आणि साहित्याच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.