खडक गल्ली येथील श्री युवक मंडळ आयोजित भव्य बक्षीस रकमेच्या दुसऱ्या मोसमातील ‘श्री चषक -2022’ अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सायंकाळी दिमाखात पार पडला.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविला जाणाऱ्या ‘श्री चषक -2022’ राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभास बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे पुरस्कर्ते विजय अचमनी व बंधू, भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, मालिकावीर पुरस्कारासाठी मोटरसायकल पुरस्कृत करणारे मल्लिकार्जुन जगजंपी, बेळगाव दक्षिण आमदारांचे बंधू शितल पाटील, समाजसेवक बाळकृष्ण तोपिनकट्टी, कोमल पाटील तसेच गल्लीतील पंच मंडळी आणि सल्लागार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार ॲड. अनिल बेनके यांनी करंडक आणि चषकांचे करण्याबरोबरच मैदानावरील क्रिकेटच्या यष्ट्यांचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी यजमान श्री युवक मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, नितेश कांबळे, विनायक चव्हाण, विश्वजीत चौगुले, सुनील कणेरी, प्रसाद शिरवळकर आदींसह बहुसंख्य क्रिकेट शौकीन उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर फटाक्यांची धमाकेदार आतषबाजी करण्यात आली.
यंदाच्या श्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेमध्ये बेळगावसह हुबळी, गोवा, मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आदी देशातील विविध राज्यांमधील एकूण 32 मातब्बर क्रिकेट संघाने भाग घेतला आहे.
मर्यादित 10 षटकांची सदर स्पर्धा येत्या 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. आता उद्या शनिवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 9 वाजता लोकमान्य महामंडळ आणि एस.पी. इलेव्हन या संघांमध्ये स्पर्धेचा उद्घाटनाचा प्रदर्शनीय सामना खेळविला जाणार आहे.