कोरे गल्ली शहापूर येथील मुरलीधर योग गुरुकुल यांच्यातर्फे आयोजित ‘रेकी आणि थर्ड आय ॲक्टिव्हेशन’ यावरील कार्यशाळा सरस्वती वाचनालय सभागृहात नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
मुरलीधर योग गुरुकुलचे गुरुवर्य मुरलीधर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास मुख्य व्याख्याते म्हणून रेकी ग्रँड मास्टर व इंजिनिअर्स कॉम्प्युटर अकॅडमीचे अध्यक्ष रमेश गंगूर आणि प्रमुख पाहुणे म्हणून के. एल. ई. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या डॉ. आशा नाईक आणि योग प्रशिक्षक कु. नव्या प्रभू उपस्थित होते.
प्रारंभी विश्वनाथ मनगुतकर यांनी स्वागत आणि नव्या प्रभू यांनी प्रास्ताविक केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रम व कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना रमेश गंगूर म्हणाले की, रेकी ही विद्या जपानमधून विकसित झाली असली तरी त्याचे मूळ भारतीय आहे. या विद्येद्वारे आपण सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आजारावर मात करू शकतो.
आपली नोकरी, व्यवसाय व कुटुंबावरही या तंत्राचा खूप सकारात्मक प्रभाव पडतो. अनेक प्रकारचे कुंडली दोष, वास्तुदोष, घरातील पाळीव प्राणी, बगीच्या, शेत आदींवरही हे तंत्र उत्तम सकारात्मक परिणामकारक सिद्ध झाले आहे असे सांगून रेकी म्हणजे पूर्णपणे प्रभावी वैश्विक किंवा अध्यात्मिक ऊर्जा असल्याचे रमेश गंगूर यांनी स्पष्ट केले.
मुरलीधर प्रभू यांनी थर्ड आय ॲक्टिव्हेशनद्वारे 6 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची दिव्य दृष्टि (सिक्स्थ सेन्स) जागृत करण्यात येते. यामुळे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात प्रचंड यश संपादन करू शकतात अशी माहिती दिली.
याप्रसंगी थर्ड आय ॲक्टिव्हेशनचे प्रात्यक्षिक सादर करताना कु. सिद्धि हळदणकर, कु. हरिप्रिया रेणके आणि कु. कौस्तुभ नाईक यांनी डोळ्यावर पट्टी बांधून समोरची व्यक्ती, त्यांचा पोशाख, त्यांची ऊर्जा, शरीरातील आजार तसेच त्यावरील उपाय सांगून सर्व प्रेक्षकांना अचंबीत केले.
सदर कार्यक्रमास दयानंद गंगूर, ओशो मेडिटेशन फाऊंडेशनच्या साधना सपारे, नंदकिशोर सपारे, बसवराज कोठीवाले, अमृता रायबागी, अमोल जैन आदींसह डॉक्टर्स, वकील, इंजीनियर्स आदी सर्व थरातील नागरिक, हितचिंतक आणि योग साधक उपस्थित होते. अमृता रायबागी यांनी सर्वांचे आभार मानले.