नैऋत्य रेल्वेने नव्याने मंजूर केलेला देसुर ते के.के. कोप्प दरम्यानचा रेल्वे मार्ग रद्द करून शेतकरी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या के.के. कोप्प, हलगीमर्डी ते नागेरहाळ मार्गे जाणाऱ्या दुसऱ्या पर्यायी रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी के. के. कोप्प ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
के.के. कोप्प (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव तालुक्यातील के.के. कोप्प, हलगीमर्डी ते नागेरहाळ या गावापर्यंत आणि पुढे हुबळीला जोडल्या जाणाऱ्या नियोजित नव्या रेल्वेमार्गाला शेतकरी व गावकर यांचा तीव्र विरोध आहे. सदर मंजूर झालेल्या नव्या रेल्वे मार्गामुळे गरीब शेतकरी आणि ग्रामस्थांवर विपरीत परिणाम होणार आहे.
सदर रेल्वे मार्ग ज्या सुपीक काळ्या जमिनीतून जातो, त्या जमिनीमध्ये शेतकरी भात, ऊस, भाजीपाला, मका, रताळी आदी विविध पिके घेतात. नव्या रेल्वे मार्गामुळे या शेतजमिनीचे नुकसान होणार असून शेतकरी रस्त्यावर येणार आहे. कोरोनामुळे आधीच लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा जर या नव्या रेल्वेमार्गाची अंमलबजावणी झाली तर समस्या आणखी वाढणार असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी नव्याने मंजूर केलेला रेल्वेमार्ग रद्द केला जावा त्याऐवजी शेतकरी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सुचविलेल्या दुसऱ्या रेल्वेमार्गाची अंमलबजावणी केली जावी.
या दुसऱ्या रेल्वे मार्गामुळे अंतरही कमी होणार असून इंधन व प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. शिवाय हा मार्ग पडीक जमिनीतून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याला खासदार इरण्णा कडाडी, अण्णासाहेब जोल्ले आणि स्थानिक आमदार आदी लोकप्रतिनिधींसह जिल्हा पंचायतीने देखील पाठिंबा दर्शविला आहे.
तरी कृपया सर्वेक्षण केलेला दुसरा पर्यायी रेल्वे मार्ग अंमलात आणावा आणि पहिला मंजूर झालेला रेल्वेमार्ग रद्द करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी सोमय्या काकती, रुद्रगौडा पाटील, बसाप्पा नरलगेरी, तीप्पांना माविकट्टी, सिद्धार्थ वाली, रामूगौडा पाटील आदींसह के.के.कोप्प ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.