बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकीच्या धर्तीवर खानापूर तालुका समितीमध्ये एकीचे वारे वाहू लागले आहेत. समितीतील दुभंगलेल्या दोन गटात एकीची चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्या संदर्भातील बैठकीसाठी येत्या सोमवारपर्यंत तारीख निश्चित केली जाणार आहे.
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकीसाठी माजी आमदार दिगंबर पाटील यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. खानापूर तालुका समितीत एकी करण्यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी जाहीर करावे. आम्ही कधीही एकीला तयार आहोत, असे माजी आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हंटले होते. मात्र त्याला कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नव्हते. आता काल सोमवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत एकीच्या प्रस्तावास संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव हे होते.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनाचा आदर राखून समितीतील दुभंगलेल्या दोन गटात एकीची चर्चा घडवून आणण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करून तसे पत्र समितीचे अध्यक्ष माजी आमदार पाटील यांना देण्यात यावे असा ठराव एकमताने बैठकीत संमत करण्यात आला.
यावेळी गोपाळराव पाटील, निरंजन सरदेसाई, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रणजीत पाटील, पी. एस. पाटील, माजी सभापती सुरेश देसाई, पुंडलिक पाटील, राजू पाटील, कृष्णा कुंभार, कृष्णाकांत बिर्जे, रवींद्र शिंदे, राजू लक्केबैलकर, रामचंद्र गावकर, सदानंद पाटील आदींनी आपले विचार मांडले. बैठकीस रवी पाटील, सूर्याजी पाटील, दत्तू काटे, भुपाल पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.