संपूर्ण रात्रभर बेळगाव शहरातील पथदीप बंद झालेले असतात. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यासंदर्भात असंख्य तक्रारी आल्यामुळे अखेर आमदार अनिल बेनके यांनी मोटरसायकलवरून रात्रीचे पेट्रोलिंग केले.
आपल्या बेळगाव शहरातील मतदारसंघातील संपूर्ण भागाचा दौरा केला. रात्रीच्या दिव्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेचे आयुक्त रुदरेश घाळी आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी आपल्या सोबत घेतले होते.
काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी दिवे जाण्याचे तसेच बंद करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रात्रीचे शहर अंधारात बुडालेले असते. याचा फायदा घेऊन रात्री प्रवास करणाऱ्यांची लूट करणे, चोरीमारी, महिलांची सुरक्षा आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. याची दखल घेत आमदारांनी रात्रीची फेरी काढून या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केला आहे.
मोटरसायकलवरून मनपा आयुक्तांना घेऊन त्यांनी ही फेरी मारली असून लवकरात लवकर ही समस्या दूर होईल. असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
या अगोदरच पोलिसांनी पेट्रोलिंग केलेली आम्ही ऐकली आहे मात्र आमदारांनी रात्रीची गस्त घालून शहराच्या समस्या जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.