विधानपरिषदेच्या 25 सदस्यांची मुदत येत्या 5 जानेवारीला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या 25 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून ती 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यापैकी दोन जागा या बेळगाव जिल्ह्यातील आहेत यामुळे आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकनियुक्त सदस्यांना या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क असतो. ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष,तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीचे सदस्य व अध्यक्ष तसेच मनपा सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिधिनी या निवडणुकीत मतदान करू शकतात. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत बेळगाव मधून महंतेश कवटगीमठ आणि विवेकराव पाटील हे उमेदवार निवडून आले होते.
यावेळी या निवडणुकीत पक्ष कोणाला उमेदवारी देणार आणि कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागलेले असणार आहे.
या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना 26 नोव्हेंबर ला जारी होणार असून 23 नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे.24 नोव्हेंबर ला अर्जाची छाननी होईल तर 26 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असेल.
यानंतर डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेला निवडणूक तर 14 तारखेला मतमोजणी होऊन निकाल बाहेर पडेल. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून तिघे इच्छूक असल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये सुनील हनमन्नावर,चन्नराज हट्टीहोळी, साधून्नावर यांचा समावेश आहे.भाजप मधून कवटगीमठ यांच्या व्यतिरिक्त दुसरे नाव समोर यायची शक्यता आहे.तर लखन जारकीहोळी हे ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. भाजप आहे त्याच उमेदवारांना उमेदवारी देणार की नवे चेहरे देणार हे अद्याप स्पष्ट नाही, तर यावेळी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समिती या निवडणुकीसाठी आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे.