वडगाव बाजार गल्ली, चावडी गल्लीच्या बाजूला भाजी विकण्यास गेलेल्या धामणे येथील एका शेतकऱ्याला तेथील आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी जबर मारहाण केल्याची घटना काल मंगळवारी घडली.
धामणे येथील शेतकरी मारुती रेमाणाचे याला जबर मारहाण करुन जखमी करण्यात आले आहे. मारुती यांने वडगाव येथील शेतकऱ्यांना हि बाब सांगिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन भाजी विक्रेत्यांना जाब विचारला. त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार करत मारहाण केलेल्यांवर कारवाई करावी अशी विनंती केली. तसेच पुन्हा असे प्रसंग घडू नयेत याची दक्षता आपण घ्यावी अशी विनंती तेथील पोलीस अधिकाऱ्यांना केली.
मागील वर्षी याच बाजारगल्लीतील भाजी, फळ, हार विक्रेते व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवावे म्हणून मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र तात्पुरती कारवाई करण्यात आल्यामुळे येथील परिस्थिती जैसे थे असून आधीपेक्षा जास्त करण्यात आले आहे आहे.
या अतिक्रमणामुळे शहापूर, वडगाव रयत गल्लीतील बैलगाड्या, ट्रॅक्टर शेताकडे शहापूर, वडगाव शिवाराकडे नेताना शेतकऱ्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजार गल्लीत केलेला मास्टर प्लॅन हा जनतेच्या सोयीसाठी आहे की त्या भाजी, फळ, हार विक्रेते व दुकानदारांसाठी आहे? असा संतप्त सवाल केला जात आहे.
तेंव्हा या सर्वांचे अतिक्रमण हटवून बाजारगल्ली कायमची खुली करत नागरिक व शेतकऱ्यांसाठी सुलभ ये-जा करण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासाठी गुरुवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी मनपा आयुक्तांना पुन्हा बेळगाव तालूका रयत संघटना तसेच शेतकऱ्यांसमवेत निवेदन देण्यात येणार आहे. तसेच जर तेथील अतिक्रमण हटले नाही तर शेतकरी बैलगाड्या, जनावर आणून बाजारगल्लीत आंदोलन करतील असा इशाराही देण्यात येणार आहे.