देशातील चित्रपट, नाटक आदींद्वारे तसेच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम आदी माध्यमांद्वारे हिंदुत्वाचा आणि हिंदू देव -देवतांचा अवमान करण्याच्या निंद्य प्रकारांना तात्काळ आळा घातला जावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
समाज हितार्थ कार्य करणारी हमारा देश ही संघटना आणि श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, दक्षिण काशी बेळगाव यांनी संयुक्तरीत्या उपरोक्त मागणी केली असून त्या संदर्भातील निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्त होण्यासाठी सिनेमा, नाटक, वेबसीरिज, टीव्ही आदी माध्यमांचा वापर केला जातो. तथापि गेल्या कांही काळापासून नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम आदी वेब सिरीजच्या माध्यमांद्वारे लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
मुद्दाम अपमानास्पद किंवा अनादर करणाऱ्या विधानांद्वारे हिंदू समाजाबाबत चुकीचा समज करून दिला जात आहे. हिंदू संस्कृती आणि देवदेवतांचा अनादर केला जात आहे. स्त्रीचे व्यक्ती म्हणून असलेले स्वातंत्र्य कधीही न मानता तिला कायम भोग वस्तू यादृष्टीने दाखविले जात आहे. तांडव वेबसिरीज याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. तांडवमध्ये अनेक आक्षेपार्ह विधाने व मजकूर दाखवण्यात आला आहे. तेंव्हा या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित सर्व माध्यमांचा उगम आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन त्यांच्या स्वैराचाराला तात्काळ आळा घालावा. तसेच तांडव वेब सिरीजवर बंदी घालावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी हमारा देश संघटना आणि श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, दक्षिण काशी बेळगावचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅनर आणि हातात जागृती फलक धरून निदर्शनेही केली.