चोर्ला घाटातील गेल्या कांही वर्षापासून दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याबद्दल समस्त बेळगाववासियांतर्फे माजी महापौर विजय मोरे यांनी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू -पाऊसकर यांचा सत्कार केला.
चोर्ला घाटातील खराब रस्ता आणि त्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप यासंदर्भात माजी महापौर विजय मोरे यांनी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू -पाऊसकर यांच्याशी चर्चा केली होती. केरी (गोवा) येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या चर्चेप्रसंगी मोरे यांनी वाहनचालकांच्यावतीने चोर्ला घाटातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी विनंती केली होती.
त्यानुसार काल प्रजासत्ताक दिनी चोर्ला घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याबद्दल माजी महापौर विजय मोरे व कॅ. नितीन धोंड यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालाजी काँक्रेटचे सचिन सामजी, रवी साळुंखे, किरण गावडे, प्रतिक गुरव, ॲलन मोरे आदी उपस्थित होते.
आता येत्या 30 दिवसात चोर्ला घाटातील खराब रस्ता हॉट मिक्सिंगद्वारे दुरुस्त केला जाणार आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुढील 15 -20 दिवस बेळगाव शहर परिसरातील गोव्याला जाणाऱ्या वाहन चालकांनी विशेषता अवजड वाहन चालकांनी कृपया चोर्ला मार्गे न जाता अन्य मार्गांचा वापर करावा, असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.