फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात इयत्ता पहिले ते नववीचे वर्ग नेहमीप्रमाणे भरविण्याबाबत विचार करण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी आणि अकरावी चे वर्ग १ फेब्रुवारी पासून नेहमीप्रमाणे संपूर्णपणे भरविण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
सर्व वर्ग सुरु करण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून गुरुवारी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. के. सुधाकर आणि राज्य कोविड तांत्रिक सल्ला समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत उपरोक्त विषयांवर प्रदीर्घ वेळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गाप्रमाणेच इतर सर्व वर्ग पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून इयत्ता पहिली ते आठवी वर्ग सुरु करण्यासंबंधी आरोग्य विभाग आणि कोविड तांत्रिक सल्ला समितीच्या बैठकीत निणय घेण्यात आला आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग पूर्ण क्षमतेने आणि कोविडच्या मार्गसूचीनुसार भरविण्यात येणार असून इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग विद्यागम उपक्रमांतर्गतच तूर्तास भरविले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात दहाहून अधिक जिल्ह्यातील अनेक शाळांना आपण भेट दिली असून पालक आणि शाळा प्रशासनाशी चर्चा करून सर्व वर्ग सुरु करण्यासंबंधी मते मिळाली. यापूर्वी तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्देशानुसार सर्व सावधगिरीचे उपाय बाळगण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागामुळे अथवा कोणत्याही शाळेतून कोविदचा संसर्ग झाला नाही, असे सुरेशकुमार म्हणाले. या बैठकीत शालेय फीबाबतही चर्चा करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला परिवहन विभाग, मागासवर्गीय विभाग, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, पदवी पर्व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.