कोविड काळात रुग्णसंख्या अतिशय प्रमाणात असणाऱ्या शहरामधून आपापल्या गावी परतलेल्या नागरिकांना विविध सरकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी राज्यसरकारने कोविड काळात स्थलांतर केलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.
ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाकडे या स्थलांतरितांचा तपशील जमा करण्याचे काम सोपविण्यात आले असून या सर्वेक्षणाचे काम महिन्याभराआधीच सुरु होणे अपेक्षित होते. मात्र ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यामुळे हे काम रखडले होते. आता पुन्हा पंचायत सर्वेक्षण विभागाचे अधिकारी काम सुरु करण्यास सज्ज झाले आहेत.
यापूर्वी पंचाययत सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मी महिन्यापर्यंत सुमारे साडेतीन लाख नागरिक ग्रामीण भागात परतले असून यानंतरही स्थलांतरितांची संख्या वाढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या सर्वेदरम्यान स्थलांतरित नागरिकांची नांवे, वय, अवलंबितांची संख्या आदी माहिती संग्रहित केली जाणार आहे. त्यासोबतच हे नागरिक ज्या शहरांमध्ये कार्यरत होते, त्या शहरांमधील कामांचा तपशील, सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणाचा तपशीलही संग्रहित करण्यात येणार आहे.