श्री यल्लमा देवस्थान जोगन भावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुले करावे. तसेच “तांडव” या वेब सिरीज वर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव तर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या मार्च 2020 मध्ये श्री यल्लमा देवस्थान, जोगनभावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिरासह अनेक हिंदू मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली.
मात्र आता प्रशासनाकडून सार्वजनिक सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असताना संबंधित मंदिराचा बंदी आदेश अद्यापही जारीच आहे. त्यामुळे लाखो भक्त मंडळींची कुचंबणा होत असून हा एक प्रकारचा अन्याय आहे. तेंव्हा संबंधित मंदिरे पूर्ववत दर्शनासाठी खुली केली जावीत. त्याचप्रमाणे अलीकडेच तांडव ही हिंदी वेबसीरीज सुरू झाली आहे.
या वेबसिरीज मध्ये हिंदूंच्या भावना दुखावली जाणारी दृश्य आहेत, याची गांभीर्याने दखल घेऊन “तांडव” वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी कोंडुसकर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.