“2020” हे वर्ष खेळाडूंसाठी अत्यंत वाईट वर्ष होतं, तसेच 2021 हे नूतन वर्ष खेळाडूंसाठी शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक असेल, असे मत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे धारवाड क्रिकेट विभाग निमंत्रक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.
सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेळगांव लाईव्ह बोलताना पोतदार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अविनाश पोतदार म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे गेल्या 15 मार्च 2020 पासून भारतासह जगात लॉक डाऊन झाल्यामुळे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सुमारे 90 टक्के अधिकृत उपक्रम बंद झाले कोरोनामुळे भारतात आयपीएल देखील झाली नाही. परिणामी आर्थिक नुकसानीसह खेळाडूंचे वैयक्तिक नुकसान देखील झाले. या कालावधीत बऱ्याच खेळाडूंचे वय निघून गेल्याने त्यांना कांही स्पर्धांमध्ये आता भाग घेता येणार नाही.
मात्र आता गेल्या आठ दिवसात आम्ही कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने 23 वर्षाखालील धारवाड विभागीय संघाची निवड केली आहे. हा संघ बेंगलोरला जाणार असून तेथे तो अन्य प्रतिस्पर्धी विभागांशी क्रिकेट सामने खेळणार आहे. यामध्ये खेळाडूंनी चांगली चमक दाखवली तर कर्नाटक राज्य संघासाठी त्यांचा नक्की विचार केला जाईल, असे पोतदार म्हणाले.
राज्य क्रिकेट संघटनेचा सध्या हा पहिला उपक्रम असून येत्या 15 दिवसात सर्व कांही सुरळीत वेळापत्रकानुसार झाले तर आम्ही 19 वर्षाखालील संघाची देखील निवड करणार आहोत. याखेरीज आमच्याकडून क्रिकेटसंबंधी अन्य उपक्रम देखील राबवले जाणार असून ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे की 2021 हे वर्ष आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने तसेच भारताचा विकास, खेळाचा विकास, खेळाडूंच्या विकास अशा सर्वांसाठी उत्तम जावो.
धारवाड क्रिकेट विभाग हा राज्यातील एकमेव असा विभाग आहे की जेथे बेळगांव व हुबळी अशा दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट मैदाने आहेत. पूर्वी आम्ही रणजी ट्रॉफी सामने आणि त्याच्या पुढचे सामने आयोजित केले होते. तसेच आयोजन यापुढेही करता येईल अशी आशा आहे असे सांगून 2021 च्या मध्यावधीत पुढील वर्षासाठी 14 व 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड केली जाईल, अशी माहिती अविनाश पोतदार यांनी दिली.
लॉकडाउनच्या काळात खेळाडूंना सराव करता आला नाही त्याचा परिणाम सामन्यांवर झाला आहे का? या प्रश्नाला अप्रत्यक्ष होकार देताना 23 वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड प्रक्रिया कशी झाली. निवड प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 280 मुलांमधून अंतिम 15 जणांच्या संघाची निवड होईपर्यंत कशा पद्धतीने क्रिकेट सामन्यांचा अवलंब करण्यात आला यांची पोतदार यांनी माहिती दिली. कोरोनामुळे सध्या पूर्वीसारखे स्वातंत्र्य नसल्यामुळे अडचणींना तोंड देत आम्ही पुढे जात आहोत असे ते म्हणाले.
2021 सालातील क्रिकेट खेळाडूंना समोरील आव्हानांच्या बाबतीत बोलताना “शारीरिक तंदुरुस्ती” हे एकमेव आव्हान खेळाडूंसमोर असेल असेही ते म्हणाले. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी कोणताही खेळ असो तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत रोजच्या रोज नियमित मेहनत घेण्याबरोबरच व्यायाम हा केलाच पाहिजे. सराव हा सांघिकपणे केला पाहिजे असे नाही तो एकट्याने ही करता येतो. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असाल तरच मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहता हे ध्यानात घेतले पाहिजे.
गत 2020 साल हे खेळाडूंसाठी अत्यंत वाईट वर्ष होते. या वर्षात बऱ्याच गोष्टी झाल्या नाहीत. आतादेखील इंग्लंडचा संघ भारतात येत असला तरी त्यांचे क्रिकेट सामने चेन्नई, पुणे आणि अहमदाबाद येथेच खेळविले जाणार आहेत. त्यामुळे याचा फटका इतर राज्यांच्या संघटनांना बसला असला तरी कोरोनामुळे नाईलाज आहे, असेही ते म्हणाले
अविनाश पोतदार हे उत्तर कर्नाटक थिएटर असोसिएशनचे देखील अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी थिएटर्सची अवस्था देखील विषद केली. कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी थियेटर बंद करण्यात आली, ती आजतागायत पूर्णपणे खुली करण्यात आलेली नाही. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही आणि आणि सरकार 100 टक्के आसन व्यवस्थेची परवानगी देत नाही तोपर्यंत थिएटर पुन्हा पूर्ववत सुरू होणे कठीण आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करून अविनाश पोतदार यांनी बेळगांव लाईव्हसह समस्त बेळगांववासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.