II गुरु लाभला साथी तर भवः सागर हा तरु I गुरु उभा पाठीशी तर भवः भय चिंता हरू II
वरील पंक्तीप्रमाणे गुरु हा केवळ शिक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. कुठे, कसे आणि कधी आपले गुरुजन आपल्या पाठीशी उभे राहतील याची कल्पनाच आपण करू शकत नाही. संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे.
अशातच कोरोना संपूर्णपणे हातपाय पसरण्याआधी सर्वप्रथम शाळा बंद करण्यात आल्या. आणि त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी शाळांनाच क्वारंटाईन सेंटर म्हणून उपयोगात आणले गेले. याकाळात शिक्षकांनाही शाळेत येणे दुरापास्त झाले. याला अपवाद म्हणून चिकोडी जिल्ह्यातील शिक्षकांचे उदाहरण घेता येईल.
चिकोडी जिल्ह्यातील शिक्षकांनी आपला सुट्टीचा वेळ हा सत्कारणी लावला आहे. आणि केवळ शिक्षकी पेशातच आपण अग्रेसर नसून शाळेसाठी आपण काहीतरी करावे या उद्देशाने चक्क हातात ब्रश घेऊन शाळेला रंग लावण्याचे काम हाती घेतले आहे.
चिकोडी जिल्ह्यातील गोकाक परिसरातील पुडकलकट्टी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या फावल्या वेळेत शाळेसाठी आपण काहीतरी करावे या उद्देशाने शाळेलाच नवीन “लूक” देण्याचे काम हे शिक्षक करीत आहेत.
त्यांच्या या उपक्रमाची दखल चिकोडीच्या डीडीपीआयनी घेतली असून त्यांचे भरभरून कौतुकही केले आहे.