Thursday, January 2, 2025

/

तब्बल 2,740 कि.मी. नॉन स्टॉप प्रवास करून पत्नीला मिळवून दिले जीवदान!

 belgaum

गंभीररित्या भाजून जखमी झालेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या त्वचा रोपणासाठी आवश्यक त्वचा आणण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 2,740 कि.मी. नॉनस्टॉप प्रवास करून बेळगावच्या केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील रोटरी स्किन बँकेतून उपलब्ध झालेली त्वचा गुजरातला नेऊन आपल्या पत्नीला जीवदान दिल्याची घटना अलीकडेच घडली.

गंभीररीत्या 70 टक्के भाजून जखमी झालेल्या कोरोनाबाधित आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी जमालपुर (गुजरात) येथील फैसल खारावाला याने लॉक डाऊनच्या काळात पत्नीच्या त्वचा रोपणासाठी 2,740 कि.मी. अविश्रांत प्रवास केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांसाठी मिसबाह खारावाला ही गंभीररित्या भाजली देशातील पहिली कोरोनाग्रस्त रुग्ण आहे. तिचा पती फैसल खारावाला याच्यासाठी 1,370 कि.मी. इतक्या दूर अंतरावरील कर्नाटकातील बेळगाव येथून पत्नीच्या त्वचा रोपणासाठी जखमा चिघळणे यापूर्वी नवी त्वचा आणणे हे एक आव्हान होते. गुजरातमध्ये स्कीन बँक अर्थात त्वचा पेढे नाही आणि खारावाला याच्याकडे तितका वेळही नव्हता. डॉक्‍टर देखील काळजीत होते. कारण कोरोनामुळे गंभीररीत्या भाजलेल्या मिसबाहची जगण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र फैसल खारावाला याने आपल्या पत्नीसाठी वेळेवर त्वचा आणून दिल्यामुळे तिचे प्राण वाचू शकले. गेल्या मंगळवारी मिसबाह हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

Misbah kharwala
Misbah kharwala

रमजानच्या कालावधीत गेल्या 9 मे रोजी रात्री स्वयंपाक घरात कुटुंबीयांसाठी चहा करत असताना घडलेल्या दुर्घटनेत मिसबाह खारवाला भाजून गंभीर जखमी झाली होती. मिसबाह ही जमालपुर या कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असल्यामुळे प्रारंभी कोणतेही हॉस्पिटल तिच्यावर उपचार करण्यास तयार नव्हते. अखेर बरीच धडपड करून तिला एलजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी खारावाला दाम्पत्यावर आणखी एक आघात झाला, तो म्हणजे तपासणीमध्ये मिसबाह कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. परिणामी तिला एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. भाजून गंभीर जखमी झालेली मिसबाह सुदैवाने 14 मे रोजी कोरोनातून बरी झाली. त्यामुळे डॉक्टरांना तिच्यावर त्वचारोपण शस्त्रक्रिया करता आली, अन्यथा जखमा चिघळून मिसबाहच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. एसव्हीपी हॉस्पिटलमधील डॉ. विजय भाटिया आणि डॉ. अमी पारीख यांनी मिसबाहवर यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचार केले.

डॉ. भाटिया यांनी सांगितले की, सहसा आम्ही त्वचा रोपणासाठी कोल्ड चेन प्रोसेसद्वारे मुंबईहून त्वचा मागवत असतो. परंतु मिसबाहच्या वेळी मुंबईच्या त्वचा पिढीकडून मदत मिळू शकली नाही. तेंव्हा आम्ही इंदोरच्या हॉस्पिटलशी संपर्क साधला होता. परंतु त्या हॉस्पिटलचे कोवीड हॉस्पिटलमध्ये परिवर्तन झाले होते. यामुळे मिसबाहसाठी त्वचा मिळण्याची शक्‍यता अंधूक झाली होती.

त्याचवेळी नॅशनल बर्न सेंटरच्या डाॅ. सुनील केसवाणी यांनी आम्हाला बेळगावच्या केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील रोटरी स्कीन बँकेच्या डॉ. राजेश पवार यांच्याकडे त्वचा उपलब्ध असल्याची माहिती दिली. परंतु आता समस्या ही होती की ती त्वचा आणायची कशी? कारण लॉक डाऊनमुळे कोल्ड चेन कुरियर यंत्रणा बंद होती. तेंव्हा 15 जून रोजी फैसल खारावाला आणि त्यांच्या कांही जिवलग मित्रांनी रस्ते मार्गाने नॉन स्टॉप प्रवास करून बेळगावहून त्वचा आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 17 जून रोजी ते त्वचा घेऊन एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये आले. या कामी आम्हाला रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि पोलिस खात्याचे विशेष सहकार्य लाभले. त्वचा रोपणासाठी आवश्यक असलेली त्वचा 17 जून रोजी सकाळी 7 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्यानंतर तासभरात मिसबाह हिच्यावर ऑटोग्राफ्ट आणि होमोग्राफ्ट अशी संलग्न शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली, असे डॉ. भाटिया यांनी स्पष्ट केले.

news courtasy : times of india

https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/he-drove-2740km-nonstop-to-save-wifes-life/articleshow/77096115.cms

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.