सर्व सामान्यांना कर भरणा किंवा इतर कोणत्याही बिलाचा भरणा करण्यास उशीर झाला तर दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रशासनाने मात्र खानापूरच्या नगरसेवकाला चांगलीच सूट दिली आहे. खानापूर नगर पंचायतीच्या एका नगरसेवकांनी लाखो रुपयांचा कर थकीत ठेवला असून या कर्मचाऱ्याविरोधात कर्नाटक सरकारच्या मुख्य कार्यदर्शीकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी कि, खानापूरच्या तोहीद चांद्खन्नावर या नवनिर्वाचित नगरसेवकाला बेकायदेशीर रित्या No Due Certificate देण्याचा प्रकार खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
तोहीद चांद्खन्नावर या नगरसेवकाने २००५-२००६ साली खानापूर नगर पंचायतीच्या टोल नाका फी वसुलीचा ठेका घेतला होता. त्यापैकी सुमारे चार लाखाहून अधिक रक्कम त्याने भरायची होती. ही बाब २००७-२००८ च्या सरकारी ताळेबंदामध्ये नमूद करण्यात आली होती. याप्रमाणे सदर रक्कम दंड आणि व्याजासहित भरून घेण्याची सूचना करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर सदर ताळेबंद पत्रकामध्ये ही रक्कम वसूल न झाल्यास महसूल खात्यास कळवून मालमत्ता जप्त करून बाकी रकमेची वसुली करण्याचीही सूचना देण्यात आली होती.
परंतु गेल्या दहा वर्षात बाकी रक्कम वसूल न करता स्वतःच्या स्वार्थासाठी संबंधित नगर पंचायतीचे कर्मचारी अशोक मठद (मुख्याधिकारी) व राजश्री वेर्णेकर व तोहीद चांद्खन्नवर (नवनिर्वाचित नगरसेवक) या सर्वानी कटकारस्थानाने एकत्रितपणे सरकारची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीस उमेदवारी भरण्यासाठी नोईजीत उमेदवाराने नगर पंचायतीची संपूर्ण बाकी भरून No Due Certificate घेणे आवश्यक होते. परंतु खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करतेवेळी नगर पंचायतीची २००५-०६ सालापासून सुमारे चार लाखाहून अधिक रक्कम बाकी असलेल्या तोहीद चांद्खन्नवर याना बेकायदेशीर रित्या No Due Certificate देण्यात आल्यामुळे हा घोळ झाला आहे. आणि याच certificate मुळे चांद्खन्नवर हे निवडूनही आले आहेत.
यामुळे सदर रक्कम त्वरित वसूल करण्यात यावी, आणि तोहीद चांद्खन्नवर याचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली खटला दाखल करण्याची मागणी सरकारच्या मुख्य कार्यदर्शींकडे करण्यात आली आहे. तसेच यासंबंधी लोकायुक्तांकडेही दाद मागण्यात येणार आहे.