न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स काही प्रमाणात आतल्या बाजूस सरकविण्यास पोलिसांना भाग पाडले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालय आवारामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशाला आणि पार्किंगला मज्जाव करण्यात आला आहे. यासाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून बेळगाव न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी बॅरिकेड्स घालून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मात्र यामुळे न्यायालय आवाराबाहेर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांच्या गर्दी बरोबरच वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. यामुळे सर्वांनाच मनस्ताप होण्याबरोबर वाहतूक पोलिसांवरील ताण वाढला होता.
याच्या विरोधात बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि वकिलांनी आज शुक्रवारी आवाज उठविला. या सर्वांनी रस्त्यावर करण्यात आलेल्या बॅरिकेड्सबाबत तीव्र आक्षेप घेतला. त्याचप्रमाणे तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना संबंधित बॅरिकेट्स रस्त्यावरून हटवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतल्या बाजूस सरकविण्यास भाग पाडले.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवाराचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करून टाका, फक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनाच या आवारात प्रवेश द्या, सर्वसामान्यांसाठी हे आवार कायमचे बंद करून टाका, असा संतप्त सल्ला देखील वकिलांनी जाता जाता पोलिसांना दिला. दरम्यान, रस्त्यावरील बॅरिकेड्स रस्त्याकडेला सरकविण्यात आल्यामुळे या मार्गावरील रहदारी थोडीफार सुरळीत झाल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले.