झारखंड येथील संमेद शिखरजीला जाऊन आलेले अथणी तालुक्यातील 13 जैन यात्रेकरू आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 20 दिवसांपूर्वी आलेल्या या यात्रेकरूंना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले होते. परंतु कोरोना तपासणी अहवाल हाती येण्यापूर्वीच हे 13 जण काॅरन्टाईन केंद्रातून बाहेर पडले होते, अशी खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत प्रभावित झालेला 40 जणांचा एक समूह झारखंड येथील शिखरजी यात्रा आटोपून 20 दिवसांपूर्वी अथणी तालुक्यात आला होता. नियमानुसार या सर्वांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी बरेच जण त्यांचा कोरोना तपासणी अहवाल हाती येण्यापूर्वीच काॅरन्टाईन केंद्रातून बाहेर पडून आपापल्या घरी गेले होते. आता जेंव्हा त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेंव्हा त्यांना पुन्हा मान्यताप्राप्त कोव्हीड हॉस्पिटलमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.
सदर 13 जण अथणी तालुक्यातील नंदगाव, सवदी, जुंजरवाड आणि बेळ्ळंकी गावातील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काॅरन्टाईन केंद्रातून बाहेर पडल्यानंतर यापैकी काहींनी प्रवास केला आहे.
एकाने तर चक्क महाप्रसादाचे आयोजन केले होते आणि न्हाव्याकडून केसही कापून घेतले आहेत. एकंदर या 13 जणांनी अनेकांना कोरोनाबाधित केल्याचा संशय आहे. त्यामुळे हे सर्वजण कोणा कोणाला भेटले? त्यांचे प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्टस् कोण आहेत? हे शोधण्याचे काम आता आरोग्य अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.