लॉक डाऊनमुळे गेल्या सुमारे दोन महिन्यापासून नृत्य शाळा बंद असल्यामुळे सर्व कलाकारसह नृत्य शाळा मालकांना फार मोठा फटका बसला आहे. तेंव्हा सर्व नियमांचे पालन करीत फक्त पाचच मुलांना घेऊन नृत्य शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जावी. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेले अनुदान हे कलाकारांना ही मिळावे, अशी मागणी कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा नृत्य शाळा संघटनेने सरकारकडे केली आहे.
कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा नृत्य शाळा संघटनेचे अध्यक्ष रवी सेठ (व्हेरी मास्टर) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सरकारने जारी केलेल्या लॉक डाऊनच्या आदेशानंतर कर्नाटक राज्यासह बेळगाव जिल्ह्यातील नृत्य शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व कलाकारसह नृत्य शाळा मालकांना फार मोठा फटका बसला आहे. आता उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यामुळे नृत्य शाळेचे भाडे देणे परवडत नाही.
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कन्नड व संस्कृतीक इलाख्याचे मंत्री सी. टी. रवी व मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना कळकळीची विनंती करण्यात आली आहे की सरकारच्या नियमाप्रमाणे मास्क ,सनीटायझर, सोशलडिस्टन्ससिंगचे पालन करीत फक्त पाचच मुलांना घेऊन नृत्य शाळा सुरू करण्याची तयारी आमचे असून यासाठी आम्हाला परवानगी द्यावी.
नृत्य शाळा बंद झाल्या तर कलाकारांनी जगावे कसे? सध्या बरेचसे कलाकार भाजी विकणे व बेकरीत काम करणे अशी मिळेल ती कामे करून आपली उपजीविका चालवत आहेत. बऱ्याच नृत्य शाळा भाडे भरता न आल्याने बंदही करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नृत्य शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेले अनुदानही कलाकारांना मिळावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
अध्यक्ष रवी शेठ यांच्यासह उपाध्यक्ष किरण कांबळे , सेक्रेटरी इमानुल कंदुला, ऑर्गनायजिंग सेक्रेटरी विश्वनाथ सव्वाशेरी व कल्चरल सेक्रेटरी विजय बसपुरी हे निवेदन सादर करतेवेळी उपस्थित होते.