खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादने सरकार मार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची उसाची प्रलंबित बिले त्वरित अदा करावीत, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भारतीय कृषक समाज या संघटनेच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. त्याचप्रमाणे आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह देखील केला. खानापूर तालुक्यातील भाजीपाल्याचे यावर्षी पूर्णपणे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला, काजू, भात आदी कृषी उत्पादनांना सध्या कवडीमोल दर मिळत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तेंव्हा सरकार मार्फत खानापूर तालुक्यातील कृषी उत्पादनांची खरेदी केली जावी. खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशानजीक असणाऱ्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. वन्य प्राणी शेतातील अन्नधान्याचे नुकसान करत आहेत. तेंव्हा त्यांचा बंदोबस्त केला जावा. याखेरीज खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली ऊस बिले त्वरित अदा केली जावीत आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना खानापूर तालुक्यातील शेतकरी व भारतीय कृषक समाजाचे सदस्य अर्जुन गावडा म्हणाले की, यंदा खानापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लावला त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. खानापूर तालुक्यात तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन झाले आहे. परंतु काजू खरेदीसाठी कोणीही पुढाकार घेत नाही आहे.
त्यामुळे कवडीमोल दराने काजूची विक्री करावी लागत आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचा सरकारकडून फक्त पंचनामा केला जातो नुकसान भरपाई मात्र क्वचितच मिळते. ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे गावडा यांनी सांगितले. यंदाची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता यापुढे खानापूर तालुक्यातील कृषी उत्पादने सरकार मार्फत खरेदी केली जावीत. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित ऊस बिले मिळावीत अशी आमची मागणी असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.