सीमा लढा हा राजकीय नाही तर तो भावनिक लढा आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी संयम पाळणे तेवढेच आवश्यक आहे. संयम पाळला तर आपल्याला केंद्रशासन व न्यायालयाची सहानुभूती मिळू शकते हे लक्षात घेतले पाहिजे असे असे सांगून मराठी जनतेचे रक्षण करणे हाच महाराष्ट्राचा धर्म आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो असे कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री व सीमाभाग समन्वयक मंत्री दीपकभाई केसरकर यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहराच्या भेटीवर आले असता आज सोमवारी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. प्रारंभी त्यांनी मराठा बँकेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढून बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मराठा बँकेच्या एपीएमसी येथील शाखेच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे यासाठी आपण निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करू. कारण ज्या समाजासाठी मराठा बँक कार्य करते त्या समाजाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्ष करत आहेत.
मराठा हा व्यापक शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला बाहेरच्या प्रदेशात मराठा असे संबोधले जात होते. त्यामुळेच समर्थ रामदास स्वामीजींनी छ. संभाजी महाराज यांना लिहिलेल्या पत्रात ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे नमूद केले होते. महाराष्ट्र धर्म वाढवायचा म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी लोकांचे रक्षण करणे हे होय, असे मंत्री दीपकभाई केसरकर यांनी सांगितले.
सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो सर्वांना मान्य करावाच लागेल. मात्र दरम्यान सीमाभागातील मराठी बांधवांच्या हितासाठी आम्ही पॅकेज तयार करत आहोत. ते पॅकेज आमचे येथील मराठी जनतेवर जेवढे प्रेम आहे तेवढेच मोठे असणार आहे हे निश्चित. सीमाभागात शांततेचे सौहार्दपूर्ण वातावरण रहावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र व कर्नाटकाच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापना झाली आहे. या समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यभाषेसह स्थानिक मराठी भाषेचा सरकारी कामकाजात तसेच नाम फलक, दिशादर्शक फलक, सूचना फलक आदींच्या बाबतीत अवलंब केला जावा यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. जेणेकरून येथील मराठी बांधवांना थोडा तरी दिलासा मिळू शकतो, असे मंत्री केसरकर म्हणाले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या नावावर एकही उमेदवार निवडणुकीत उभा करणार नाही असे जाहीर केले होते. त्यांच्या विचारानुसार आम्ही चालत आहोत. बेळगावसह सीमा भागातील सर्व समस्या व मागण्यांची माहिती मी घेतली आहे. महाराष्ट्राच्या अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी पाच वर्षे काम केले असल्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पात आवश्यक सर्व गोष्टींसाठी निधीची तरतूद करून सीमा भागातील मराठी बांधवांना दिलासा दिला जाईल. कोंकण आणि बेळगाव यांचे 100 वर्षपेक्षा जुने नाते आहे. मी तर लहानपणापासून बेळगावला येत होतो. त्यामुळे माझे बेळगावशी जवळपास 60 वर्षांपासूनचे संबंध आहेत. ते लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य या नात्याने बेळगाव बद्दलची माझी आपुलकी आणि नातं जपत मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने बेळगाव सीमाभागात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीमाप्रश्नासंदर्भात बोलताना एखादा लढा जितका प्रदीर्घ चालतो तितका संयम राखणे गरजेचे असते. आता कर्नाटकात निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे आम्ही काहीही केलं तर त्याला राजकीय रंग दिला जाऊ शकतो. सीमालढा हा राजकीय नाही, तो भावनिक लढा आहे हे लक्षात घेऊन संयम पाळणे तेवढेच आवश्यक आहे.
संयम पाळला तर आपल्याला केंद्र सरकार व न्यायालयाची सहानुभूती मिळू शकते एखादा विषय न्यायप्रविष्ठ असतो तेव्हा संयम पाळणे महत्त्वाचे असते तो आपण सर्वांनी पाळावा असे सांगून महाराष्ट्रातील संपूर्ण जनता सीमाभागातील मराठी बांधवांच्या कायम पाठीशी आहे हे मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो असे सीमाभाग समन्वयक मंत्री दीपक भाई केसरकर यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी मराठा को-ऑपरेटिव्ह बँक चेअरमन दिगंबर पवार, व्हा. चेअरमन निना काकतकर, ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, सुनील अष्टेकर, विनोद हंगीगेकर, शेखर हंडे, रेणू किल्लेकर, शंकर बाबली, विकास कलघटगी बँकेचे जनरल मॅनेजर, इतर सभासद, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.