Friday, April 26, 2024

/

जमीन संपादनाविरोधात पंतप्रधानांकडे साकडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दक्षिण-पश्चिम रेल्वे साठी संपादित करण्यात येणाऱ्या सुपीक जमिनींसंदर्भात आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किणेकर आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सर्कल ऑफिसर राजू गलगली आणि तलाठी मंजुनाथ टिप्पोजी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.

नंदिहळ्ळी गावातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकसाठी बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ या जमिनीवरच सुरु आहे.

मात्र खासदारांच्या प्रभावाखाली असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे. देसूर ते के. के. कोप्प पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून या ट्रॅकच्या माध्यमातून अनेक गावे हुबळीशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. या जमिनी संपादनासाठी ग्रामस्थांचा निषेध आहे.

 belgaum

परंतु ग्रामस्थांचा निषेध डावलून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जमिनी संपादित करून निर्माण होत असलेल्या रेल्वे ट्रॅक मुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर, उत्पन्नाच्या स्रोतांवर मोठा परिणाम होणार आहे. शिवाय या जमिनी सुपीक असून या पाणथळदेखील आहेत. त्यामुळे याचा फटका गावासह निसर्गालाही बसू शकतो.Pmo

रेल्वे किंवा सरकारच्या कोणत्याही विकासकामाला आमचा विरोध नाही. मात्र सुपीक जमिनी संपादित करून त्यावर रेल्वे ट्रॅक निर्माण करण्या ऐवजी माळरान जागेतून रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून समस्त गावकरी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित गावातील शेतकऱ्यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह तत्कालीन खासदार दिवंगत सुरेश अंगडी आणि इतर लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. मात्र शेतकऱ्यांचे हे गाऱ्हाणे ऐकून घेण्यास कोणीही तयार नाही. याप्रश्नी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. मात्र याचाही कोणता उपयोग न झाल्याने पंतप्रधानांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अन्यथा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करण्याचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नंदिहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्षा सुवर्णा हंपन्नावर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन लोकूर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.