belgaum

बेळगाव मनपाचा अनधिकृत खोक्यांवर हातोडा

0
165
City corporation logo
City corporation logo
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका लावला असून, आरपीडी सर्कल नंतर आज हिंडलगा परिसरातील अनधिकृत खोकी आणि फलकांवर कारवाई करण्यात आली. अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

शहरातील फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने आपला मोर्चा हिंडलगा गणेश मंदिर परिसराकडे वळवला. येथे रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभारलेली १० ते १५ खोकी महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या मोहिमेदरम्यान केवळ छोटी दुकानेच नव्हे, तर रस्त्याच्या मर्यादेत येणारे बारचे फलक आणि मोठ्या जाहिरातींचे बोर्डही हटवण्यात आले. आपल्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत संतप्त व्यापारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये यावेळी मोठी शाब्दिक चकमक उडाली. व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली.

 belgaum

शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि विद्रुपीकरण करणारी अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.