बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ‘गेल’ (GAIL) इंडिया या नामांकित संस्थेशी महत्त्वपूर्ण करार केला असून, लवकरच शहरात १०० कोटी रुपये खर्चाचा बायोगॅस प्रकल्प साकारणार आहे. कचऱ्यापासून गॅस निर्मिती करून प्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे.
शहरात दररोज संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असे आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. बेळगावमधील ५८ वॉर्डांमधून दररोज अंदाजे २१५ टन कचरा जमा होतो. यातील १५० टन ओल्या कचऱ्याचा वापर करून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील डम्पिंग यार्डवरील ताण कमी होऊन नैसर्गिक ऊर्जेची निर्मिती होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १० एकर जागेची आवश्यकता असून राज्य मंत्रिमंडळाने त्यास आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेचे अधिकारी शहराच्या उपनगरांमध्ये आणि सीमाभागात योग्य जागेचा शोध घेत असून लवकरच जागा निश्चित केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे कचरा डेपोमधील दुर्गंधी आणि प्रदूषणापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे हे आधुनिक तंत्रज्ञान बेळगाव शहराच्या स्वच्छतेत मोठे परिवर्तन घडवून आणेल, अशी प्रतिक्रिया कार्तिक एम. यांनी व्यक्त केली आहे.




