बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे , उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नसून मरेपर्यंत उद्धव बाळासाहेबांचा सैनिक म्हणून अपक्ष काम करत राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी आपल्या समर्थ निवासस्थानी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती दिली. आपण शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून माझे सोबत उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, शहर उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, राजू तुडयेकर यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते राजिनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती गोरले यांनी दिली.
बेळगाव जिल्हा परिसरात सचिन गोरले यांनी शिवसैनिक म्हणून कारकीर्द गाजवली आहेत. त्यानंतर बेळगाव तालुका प्रमुखपदी काम करत बेळगावसह खानापूर तालुका भागात पक्ष संघटना बळकट करण्याचे काम केले आहे. सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच पक्षाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सचिन गोरले यांनी विविध आंदोलने, सभा, निवडणुकामध्ये यशस्वी नेतृत्व केले आहे.
सध्या पक्ष संघटना बळकटिला वाव देण्याचे कार्य होत नाही. याखेरीज शिवसेनेची आपल्याच माणसाकडून पक्ष बदनाम होत आहे. तरी देखील त्यांची कोणतीच दखल घेतली नाही. मी म्हणजे शिवसेना असा भ्रम असलेल्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जात नाही. शिवाय पक्ष स्वतंत्र ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नही करत नाही. वर्षानूवर्ष हिच परंपरा म्हणून मिरवणाऱ्या पक्षातील नेत्यांनी आता थांबण्याची गरज आहे, अशी खंतही पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, बेळगाव ( सिमाभाग ) शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारीमुळे शिवसेना ढासळलेली आहे. स्वतः म्हणजे पक्ष असे कार्य गरजेचे असताना पक्षाच्या वारंवार होणाऱ्या बदनामीमुळे नाराज होऊन सचिन गोरले आणि संबंधित इतरांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणून राम राम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या चार-पाच दिवसांत त्यांच्याकडून हा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.