belgaum

दरवर्षीप्रमाणे शहरातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेतर्फे येत्या शनिवार दि. 28 ते सोमवार दि. 30 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये भव्य हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे या रथोत्सवाचे 25 वे वर्ष आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे प.पू. श्री भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी दिली.

bg

शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या ठिकाणी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आतापर्यंत हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव दोन दिवस साजरा केला जात होता. मात्र यंदाचा हा 25 वा रथयात्रा महोत्सव असल्यामुळे उत्सवाचा कालावधी आणखी एक दिवस वाढविण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवारी 28 रोजी दुपारपासून सायंकाळपर्यंत रथयात्रा होईल. त्या दिवशी सायंकाळ नंतर शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्याच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम होतील.

हे कार्यक्रम 28 ते 30 जानेवारी असे सलग तीन दिवस होणार असून त्यामध्ये प्रवचन, वरिष्ठ अतिथी भक्तांचे कीर्तन व भजन यांचा समावेश असेल. याखेरीज भरतनाट्यम गीता पाठ, लहान मुलांचे राम रामायण आदी अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आपल्या देशाची संगीत, नृत्य यासारखी पारंपारिक संस्कृती जिवंत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त इस्कॉन भक्तांतर्फे अध्यात्मिक विषयावर श्रीमद् भागवतावर आधारित दोन नाटकं सादर केली जातील. तसेच कठपुतलीचे कार्यक्रम होतील, अशी माहिती श्री भक्तीरसामृत स्वामीजींनी दिली.

रथोत्सवानिमित्त श्री भगवद्गीता प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या ठिकाणी प्रदर्शनात मांडलेल्या प्रत्येक चित्राची नागरिकांना माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्यांची त्यांच्या इच्छेनुसार प्रदर्शनात काय पाहिलं? कोणती माहिती घेतली? यावर छोटीशी परीक्षा घेतली जाईल आणि प्रत्येकाला आध्यात्मिक पुस्तक स्वरूपात बक्षीस दिले जाईल. इस्कॉनचे सदस्य असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी मृत्यूचा सामना कसा करावा, मृत्यूची तयारी कशी करावी यावर एक अतिशय सुंदर नाटक सादर करणार आहेत. महोत्सवाच्या ठिकाणी विविध साहित्य यांच्या स्टॉल्ससह लहान मुलांसाठीचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रथोत्सवाच्या तीन दिवसाच्या कालावधीत इस्कॉनची गोशाला आणि गोमाता संबंधित प्रदर्शन भरविले जाईल असे स्वामीजींनी सांगितले.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुरक्षा व्यवस्था तितकी चांगली नाही हे लक्षात घेऊन इस्कॉनने अलीकडेच दोन-चार महिन्यापूर्वी जांबोटी येथे संपूर्ण ग्रामीण स्वास्थ सुरक्षा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी आमचे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स वैद्यकीय सेवा देत आहेत. या प्रकल्पाचा एक स्टॉल देखील महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहे. या स्टॉलला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी. दरवर्षीप्रमाणे हरेकृष्ण रथयात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात काढली जाईल आणि त्यामध्ये इस्कॉन बेळगावचे हजारो भक्तच नव्हे तर परदेशातील अध्यात्मिक विचारसरणीचे नागरिक -भक्त सहभागी असणार आहेत. मिरवणुकीच्या केंद्रभागी एक भव्यरथ असेल ज्यात श्री राधाकृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान विराजमान असतील. मिरवणुकीत अनेक सुंदर डायोरामा देखील असतील. ज्यात भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे वर्णन केले जाईल.Iskcon press meet 2023

बैलगाडी स्पर्धेचा एक भाग म्हणून मिरवणुकीत सुंदर सजवलेल्या बैलगाड्या असतील. मिरवणुकी दरम्यान 50 हजार हून अधिक प्रसादाच्या पाकिटांचे आणि भगवद्गीतेवर आधारित विविध भक्ती साहित्याचे वाटप केले जाईल असे सांगून शहरवासीयांनी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही श्री भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी केले. पत्रकार परिषदेत प्रसंगी श्री राम दास, मदन गोविंद दास, संकर्षण दास, नागराज केंदोळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी 1:30 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून आरती झाल्यानंतर हरे कृष्ण रथयात्रा मिरवणुकीला सुरुवात होईल. ही रथयात्रा ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार -शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड मार्गे गोवावेस येथून शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराच्या ठिकाणी समाप्त होणार आहे.

yash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.