belgaum

मनपात गदारोळ; ठरावाच्या मागणीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या सभेत आज पुन्हा एकदा सीमाप्रश्न आणि ‘बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक आहे’ या ठरावावरून जोरदार राजकीय गोंधळ झाला. ठराव घेण्याच्या मागणीवरून काँग्रेसचे सरकार नियुक्त नगरसेवक, उर्दू नगरसेवक आणि इतर सदस्यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.

सभेच्या सुरुवातीला मागील सभेतील ठराव वाचून मंजूर करण्याच्या प्रक्रियेत ठराव क्रमांक ३५८चा विषय समोर आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर महापालिका सभागृहात चर्चा करू नये, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले.

याला काँग्रेसचे सरकार नियुक्त नगरसेवक रमेश सोनटकक्की यांनी विरोध केला. गेल्या तीन-चार महिन्यांपासून बेळगाव ‘कर्नाटकाचा अविभाज्य घटक’ असल्याचा ठराव घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आजच्या सभेत हा ठराव मंजूर झालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

 belgaum

यानंतर काँग्रेस आणि उर्दू नगरसेवकांनी ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली.

दरम्यान, महापौर प्रीती कामकर यांनी महापालिका कर्नाटक राज्यातील असून कन्नड भाषेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सीमाप्रश्नाशी संबंधित ठरावावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. सरकारकडून भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या विषयावर पुढील चर्चा करता येईल, अशी भूमिका महापौरांनी मांडली.

‘भाषेच्या राजकारणासाठी नव्हे, विकासासाठी निवडून आलो’

सभागृहातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. आपण पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो असून शहराचा विकास करण्यासाठी काम करायचे आहे. मराठी-कन्नड भाषेच्या वादात न पडता विकासाच्या विषयांवर चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले.

पेडणेकर यांच्या या भूमिकेमुळे सभागृहातील चर्चेला वेगळे वळण मिळाले. भाषिक मुद्द्यांपेक्षा शहरातील विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘विकासाची एवढीच काळजी असेल तर तीन महिने सभा का नाही?’

दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केला. महापालिकेच्या बैठका मागील काही महिन्यांत झाल्या नसताना आता विकासाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा सवाल करण्यात आला.

‘तीन-तीन महिने बैठक झाली नाही, मग विकासकामांवर चर्चा कशी होणार?’ असा सवाल काँग्रेसच्या बाजूने उपस्थित करण्यात आल्याने भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

सभागृह तहकूब; गणेशोत्सवाच्या तयारीकडे लक्ष

गोंधळ वाढत गेल्यानंतर सभागृहाचे कामकाज जेवणाच्या वेळेत तहकूब करण्यात आले. त्यामुळे सीमाप्रश्नावरील ठरावावर आज अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

महापालिकेतील या घडामोडींमुळे सीमाप्रश्न पुन्हा एकदा स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एका बाजूला ठराव घेण्याची मागणी, तर दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा दाखला देत त्यावर चर्चा टाळण्याची भूमिका, यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भातील विषयही पुढे येणार असल्याची माहिती सभागृहातील चर्चेतून समोर आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.