belgaum

सावगाव ग्रामस्थांची गायरान जमिनींच्या संरक्षणासाठी खासदारांकडे मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सावगाव येथील गायरान महसूल जमिनींचे संरक्षण करून त्या भविष्यात सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सावगाव ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. गावातील गायरान जमिनींचे भविष्यात व्यावसायिक कारणांसाठी वाटप किंवा हस्तांतरण होण्याची शक्यता व्यक्त करत, या जमिनी सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी कायमस्वरूपी संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे क्रमांक 153 मधील 2 एकर 25 गुंठे जमीन गो-स्मशानासाठी राखून ठेवण्याची मागणी आहे. यासंदर्भात बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये 17 ऑगस्ट 2021 रोजी ठराव करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. सदर जमीन आरटीसी (पहाणी) नोंदवहीत ‘गो-स्मशान’ म्हणून नोंदवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

तसेच सर्व्हे क्रमांक 149 मधील 6 एकर 27 गुंठे जमिनीपैकी 20 गुंठे जमीन अनुसूचित जातीच्या नागरिकांना आणि 2 एकर जमीन हिंदू समाजाच्या स्मशानभूमीसाठी यापूर्वीच देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे 4 एकर 7 गुंठे जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याशिवाय सर्व्हे क्रमांक 132 मधील 5 एकर 9 गुंठे, 238 मधील 2 एकर 24 गुंठे, 135 मधील 5 एकर 3 गुंठे आणि 129 मधील 2 एकर जमिनीचा सार्वजनिक उपयोगासाठी नियोजनबद्ध वापर करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला आहे.

या जमिनींपैकी काही भागात पशुपालन रुग्णालय, हायस्कूलसाठी बाग, कुस्ती व मल्लखांबासाठी जागा, विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याचा मार्ग, क्रीडांगण, पार्किंग तसेच व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी आदी खेळांसाठी सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच सरकारी प्राथमिक शाळा, कन्नड व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि अन्य शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठीही जमीन राखून ठेवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

चार स्मशानभूमींना शेड व संरक्षक भिंतीची मागणी

दरम्यान, सावगावमधील सार्वजनिक वापरातील चार स्मशानभूमींना आवश्यक शेड आणि संरक्षक भिंती बांधण्यासाठी खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून (MPLADS) निधी मंजूर करावा, अशी स्वतंत्र मागणीही करण्यात आली आहे.

पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अंगणवाडी क्रमांक 219 साठीही निधीची मागणी

सावगाव येथील अंगणवाडी क्रमांक 219 साठी सुसज्ज इमारत बांधण्यासाठी खासदार निधीतून आवश्यक अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. लहान मुलांना चांगले शैक्षणिक व पोषणात्मक वातावरण मिळावे, यासाठी ही सुविधा आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

गायरान जमिनी या सार्वजनिक हितासाठी महत्त्वाच्या असून त्यांचा व्यावसायिक वापर किंवा अन्य प्रकारचे हस्तांतरण टाळून त्या भविष्यातील पिढ्यांसाठी संरक्षित ठेवाव्यात. यासाठी संबंधित कर्नाटक शासनाच्या प्राधिकरणाकडे शिफारस करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.

या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने यल्लाप्पा एम. पाटील, कल्लाप्पा मल्लाप्पा पाटील कुपट यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.