बेळगाव लाईव्ह : उसाचा दर, वजन पारदर्शकता आणि एथॅनॉल धोरणाबाबत शेतकरी समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ‘एफआरपी’मध्ये वाढ केली आहे, मात्र इतर पाच राज्यांप्रमाणे कर्नाटक सरकारने ‘एसएपी’ लागू केलेला नाही.
उसाची एफआरपी, एथॅनॉल खरेदी, वजन आणि रिकव्हरी या सर्व विषयांवर स्थापन केलेली समिती अभ्यास करून अहवाल देणार आहे. साखरेपासून एथॅनॉल खरेदीचे प्रमाण वाढवण्यासाठी पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस वजनात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारला सल्ला दिला जाईल, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी चर्चेसाठी दिल्लीत यावे असे आवाहन केले. याच वेळी राज्यातील गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.





