belgaum

कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट आणि पुनर्वापर ही काळाची गरज : आयुक्त कार्तिक एम.

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: घनकचऱ्यासह विविध प्रकारच्या कचऱ्याची तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि त्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे, असे बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारच्या नगरविकास विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) सुवर्ण विधानसौध येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावित उपनियमांवर राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बेळगाव आणि कलबुर्गी विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित घटकांच्या सहभागातून झालेल्या या बैठकीचे उद्घाटन आयुक्त कार्तिक एम. यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना त्यांनी, २०१६ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता शासनाच्या मार्गदर्शनाखाली नियमांमध्ये आवश्यक बदल आणि नव्या तरतुदींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांकडून सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट केले.

 belgaum

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी होते. त्यांनी कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती दैनंदिन जीवनाचा भाग असल्याची जाणीव नागरिकांनी ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिक, विविध संस्था आणि प्रशासन यांच्या सहभागातूनच कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संदीप बागेवाडी यांनी औद्योगिक विकासासोबतच कचरा व्यवस्थापनाच्या नियमांविषयी उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. यामुळे शहराचा विकास अधिक वेगाने होण्यासह परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

हॉटेल उद्योजक संघाचे अध्यक्ष संजय पै यांनीही यावेळी विचार मांडले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बेळगाव विभागीय अधिकारी हनमंतप्पा, पौरप्रशासन संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता भानुमती यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे प्रस्तावित नियमांची माहिती दिली. तसेच बेळगाव आणि कलबुर्गी विभागांतील सहभागी प्रतिनिधींनी सविस्तर चर्चेदरम्यान मौखिक आणि लेखी स्वरूपात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हनमंत कलादगी यांनी स्वागत केले. बसवराज कुप्पसगौडर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.