belgaum

शिक्षक भरतीत मराठी माध्यमावरील अन्यायाप्रकरणी निवेदन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या आश्वासनानुसार २०० जागा भरण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्यामार्फत शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ४९२ पदे रिक्त असताना पहिल्या टप्प्यात एकही जागा देण्यात आली नव्हती. त्यानंतर मराठी भाषिकांच्या मागणीनंतर सरकारने २०० जागा भरण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ ७८ जागांसाठीच अधिसूचना काढण्यात आली असून बेळगाव जिल्ह्याच्या वाट्याला अवघ्या ३९ जागा आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यासाठी ३९, चिकोडीसाठी २६ आणि बिदर जिल्ह्यासाठी १३ अशा केवळ ७८ जागांचे वाटप केल्याचे नमूद केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार ४९२ शिक्षकांची गरज असताना आश्वासन न पाळल्याने शाळा व विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, तातडीने २०० जागा न भरल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.

राज्य सरकारच्या १५ हजार शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या ४९२ जागा रिक्त असतानाही केवळ ७८ जागांचा आदेश काढल्याने बी.एड. उमेदवार आणि मराठी शाळांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. मराठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त जागांचा आदेश वाढवून भरती प्रक्रिया राबवावी आणि शिक्षणमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवावे, अशी मागणी केल्याचे अंकुश केसरकर यांनी म्हटले.

 belgaum

पंधरा हजार शिक्षक भरतीत मराठी माध्यमासाठी केवळ ७८ जागा देण्यात आल्या असून बी.एड. आणि पदवीधर उमेदवारांवर अन्याय झाला आहे. अधिवेशनापूर्वी शिक्षणमंत्र्यांची भेट घडवून आणावी आणि भरती प्रक्रिया सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, अशी भूमिका आर. एम. चौगुले यांनी मांडली.

या संदर्भात युवा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्याशी चर्चा केली. हा प्रश्न तातडीने वरिष्ठ पातळीवर मांडून पाठपुरावा केला जाईल आणि मराठी माध्यमाच्या जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन लीलावती हिरेमठ यांनी दिले.

यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, ॲड. अमर येळूरकर, आर. एम. चौगुले, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सूर्याजी रावजी पाटील, संतोष कृष्णाचे, सुरज कुडूचकर, किरण मोदगेकर, किसन सुंठकर, आकाश भेकणे आणि प्रवीण कोराने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.