बेळगाव लाईव्ह : गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, या उद्देशाने विद्या आधार एज्युकेशन अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने शांतााई विद्या आधार उपक्रमांतर्गत २० विद्यार्थ्यांना एकूण २ लाख रुपयांची शैक्षणिक आर्थिक मदत वितरित करण्यात आली.
बुधवारी भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ४८५ हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मांचलवार सुधाम उपस्थित होते. त्यांनी विद्या आधार आणि भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणे ही मोठी सामाजिक सेवा असून, विद्यार्थ्यांनी या मदतीचा योग्य उपयोग करून आपल्या ध्येयाच्या दिशेने मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि जे.जी.एन.डी. भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हिराचंद कलमानी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोतदार, भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सावित्री दोड्डण्णावर, सामाजिक कार्यकर्ते नितीन खोत, विद्या आधारचे अध्यक्ष विनायक बोंगाळे तसेच शांतााई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष व बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हिराचंद कलमानी यांनी विजय मोरे आणि दिवंगत अध्यक्ष राजू दोड्डण्णावर यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. नितीन खोत यांनी जुनी वर्तमानपत्रे आणि पुस्तके संकलित करून त्यांची विक्री केली जाते आणि त्यातून मिळणारा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जात असल्याची माहिती दिली.

अविनाश पोतदार यांनी शिक्षण, कठोर परिश्रम, कृतज्ञता आणि चांगला माणूस बनण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणात विजय मोरे यांनी शांतााई विद्या आधार उपक्रमाच्या आजवरच्या प्रवासाची माहिती दिली. या उपक्रमातून मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे यश संपादन केल्याच्या प्रेरणादायी कथा त्यांनी सांगितल्या. यावेळी त्यांनी एका माजी विद्यार्थिनीचे उदाहरण दिले. नोकरी मिळाल्यानंतर दरमहा दीड लाख रुपये वेतन मिळवणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या पहिल्या पगारातील दीड लाख रुपये पुन्हा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केले. समाजाकडून मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून भविष्यात यशस्वी झाल्यानंतर इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अविनाश पोतदार यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल विजय मोरे यांनी आभार व्यक्त केले. तसेच शांतााईच्या विविध उपक्रमांसाठी २ लाख रुपयांचे योगदान दिल्याबद्दल नितीन खोत यांचे विशेष कौतुक केले.
लाभार्थी विद्यार्थी अभिषेक निलजी आणि रेवती पाटील यांनी आपले अनुभव व्यक्त करत संस्थेने केलेल्या शैक्षणिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर २० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
विद्या आधारचे संचालक प्रसाद प्रभू यांनी स्वागत केले, तर संस्थेचे सचिव ॲलन मोरे यांनी आभार मानले. नमोकार मंत्र आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश गावळी, गंगाधर पाटील, दयानंद कदम आणि शांतााईच्या अन्य सदस्यांसह अनुराधा तिगडी व भरतेश शैक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




