belgaum

लिंबाळेंच्या वक्तव्यावरून संताप, गुणवंत पाटील, अमित देसाई, सागर पाटील आक्रमक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सीमा भागात उमटू लागले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते अमित शिवाजीराव देसाई आणि सागर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदविला आहे. लिंबाळे यांनी सीमा प्रश्नाचा इतिहास आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तिघांनीही केली आहे.

गुणवंत पाटील : सीमा लढ्याचा इतिहास न समजता केलेले वक्तव्य खेदजनक

ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी शरणकुमार लिंबाळे यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. बेळगावचा सीमा प्रश्न, त्यासाठी सीमाभागातील मराठी माणसांनी केलेला त्याग आणि या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या कार्यकर्त्यांचा इतिहास लिंबाळे यांनी अभ्यासलेला दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले.

 belgaum

गेल्या ७० वर्षांपासून सीमाभागातील मराठी माणूस आपल्या भाषिक अस्मितेसाठी संघर्ष करीत आहे. अनेकांनी घरादारावर पाणी सोडून या लढ्यात योगदान दिले आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांकडून या संघर्षाबाबत अशा प्रकारचे वक्तव्य होणे खेदजनक आणि संतापजनक असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनांमध्ये सीमा प्रश्नाचा ठराव सातत्याने मांडला जातो. हा प्रश्न न्यायालयात नेण्याचा निर्णयही साहित्य संमेलनातील ठरावातून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भूमिकेला विरोध करणाऱ्या लिंबाळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यास सीमाभागातून तीव्र विरोध होईल आणि साहित्य संमेलनाला विरोध करण्याची भूमिका घेतली जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

अमित देसाई : लिंबाळेंच्या भूमिकेमागील हेतू स्पष्ट व्हावा

युवा कार्यकर्ते अमित शिवाजीराव देसाई यांनीही लिंबाळे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विधानामागील भूमिका आणि हेतू स्पष्ट होण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्राचा इतिहास, मराठी भाषेची अस्मिता आणि सीमा प्रश्नाची पार्श्वभूमी माहीत नसताना अशा प्रकारचे वक्तव्य कसे केले जाऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

१९४६ मध्ये बेळगाव येथे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाल्याची आठवण करून देत, बेळगाव आणि सीमाभागाचा महाराष्ट्राच्या चळवळीशी असलेला ऐतिहासिक संबंध त्यांनी अधोरेखित केला.

सीमाभागातील मराठी भाषिक हे या भूमीचे भूमिपुत्र असून सीमा प्रश्न हा त्यांच्या हक्काचा आणि अस्मितेचा विषय आहे. या प्रश्नासाठी अनेकांनी रक्त सांडले आणि प्राणांचे बलिदान दिले आहे. अशा परिस्थितीत या संघर्षाकडे दुर्लक्ष करणारी भूमिका मांडणे चुकीचे असल्याचे देसाई यांनी सांगितले.

लिंबाळे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करून माघार घ्यावी. तसेच यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांनीही या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि लिंबाळे यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुण्यात होणाऱ्या संमेलनात सीमा प्रश्नासंदर्भात ठराव मांडण्याचे आव्हानही त्यांनी लिंबाळे यांना दिले.

सागर पाटील : अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनीही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने लिंबाळे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. १९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावाला सहमती मिळाली होती. बेळगावसह संपूर्ण सीमाभाग हा मराठीबहुल प्रदेश असून भाषावार प्रांतरचनेच्या वेळी या भागावर अन्याय झाल्याची भावना आजही येथील मराठी भाषिकांमध्ये कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

२००४ पासून महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाची लढाई लढत असताना, या प्रश्नाची जाणीव न ठेवता केलेले वक्तव्य सीमाभागातील मराठी माणसांच्या भावनांना ठेच पोहोचवणारे असल्याचे पाटील यांनी म्हटले.

लिंबाळे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा त्यांना या पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सीमाभागातील साहित्यिक आणि कार्यकर्त्यांकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

शरणकुमार लिंबाळे यांच्या वक्तव्यामुळे सीमाभागातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सीमा प्रश्नाचा ऐतिहासिक संदर्भ, मराठी भाषिकांचा दीर्घकालीन संघर्ष आणि साहित्य संमेलनांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकेचा विचार करून लिंबाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या तिन्ही वक्त्यांनी केली आहे.

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या वादावर लिंबाळे काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.