belgaum

कर्नाटकातील मराठा समाजाच्या एकजुटीसाठी सकल मराठा समाजाचा व्यापक संकल्प

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील मराठा समाजाला एका समान व्यासपीठावर आणून समाजाची एकजूट, संघटन आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज, कर्नाटकच्या वतीने व्यापक संघटनात्मक उपक्रम हाती घेण्यात येत आहे. श्री किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत समाजातील ज्येष्ठांचा सन्मान, कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव आणि डिजिटल माध्यमातून समाजबांधवांची नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली. समाजातील ज्येष्ठांचे अनुभव, युवकांची ऊर्जा, माता-भगिनींचा सहभाग आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांचे योगदान यांचा समन्वय साधून सक्षम व संघटित समाजाची उभारणी करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी यंदापासून ‘वीरमाता जिजाऊ पुरस्कार’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, क्रीडा, सहकार, वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योग, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे १५० ज्येष्ठ व कर्तृत्ववान मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

 belgaum

डिजिटल नोंदणी ॲपच्या माध्यमातून समाजाचे संघटन

संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजबांधवांना एका व्यासपीठावर जोडण्यासाठी ‘सकल मराठा समाज नोंदणी ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून समाजबांधवांची डिजिटल नोंदणी, माहिती संकलन आणि भविष्यातील सामाजिक उपक्रमांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी

पूजनीय स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजातील वरिष्ठ आणि अनुभवी मान्यवरांच्या सहभागातून या उपक्रमाची पुढील वाटचाल निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र आयोजन समिती आणि पुरस्कार निवड समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

फेब्रुवारी २०२७ मध्ये भव्य पुरस्कार सोहळा

फेब्रुवारी २०२७ च्या दुसऱ्या आठवड्यात भव्य पुरस्कार वितरण आणि नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची निश्चित तारीख, स्थळ तसेच विविध समित्यांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

दरम्यान, हा उपक्रम केवळ पुरस्कार आणि सत्कार सोहळ्यापुरता मर्यादित नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक आराखडा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिक्षण, रोजगार, युवकांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रबोधन आणि गरजू समाजबांधवांना मदत अशा विविध क्षेत्रांत एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

समाजातील मतभेद बाजूला ठेवून परस्पर सहकार्य आणि विश्वासाच्या बळावर सर्वांनी एका व्यासपीठावर एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कर्नाटकातील सर्व मराठा समाजबांधव, ज्येष्ठ मान्यवर, युवक, माता-भगिनी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी माधुरी जाधव, हलगेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘ज्येष्ठांचा सन्मान, नव्या पिढीला प्रेरणा; एकजुटीतून संघटन आणि संघटनेतून समाजाची सर्वांगीण प्रगती’ हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. ज्येष्ठ पाच पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे अशी ही माहिती किरण जाधव यांनी दिली .यावेळी सतीश बाचीकर, डॉ निवृत्त कॅप्टन चांगप्पा पाटील, शशिकांत रणदिवे, राजन जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.