belgaum

सीमाप्रश्नावर बोलताना नेमकं काय म्हणाले लिंबाळे?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी बेळगाव सीमाप्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमाप्रश्नावर भूमिका विचारली असता त्यांनी केलेल्या विधानांमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एका मुलाखतीदरम्यान पत्रकाराने सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, सीमाप्रश्न आणि दरवर्षी मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव याबाबत त्यांची भूमिका विचारली. त्यावर उत्तर देताना लिंबाळे यांनी हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत, न्यायदेवता कधी डोळे उघडेल हे आपल्याला माहीत नसल्याचे म्हटले.

मात्र, त्यानंतर त्यांनी केलेल्या विधानांनी लक्ष वेधले. बेळगावमध्ये मराठी माणूस आहे म्हणून बेळगाव महाराष्ट्रात यावे अशी मागणी केली जाते. मात्र मराठी माणूस केवळ बेळगावमध्येच नसून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केरळ आणि तामिळनाडूसह जगभर विखुरलेला आहे. म्हणून काय संपूर्ण जग महाराष्ट्रात आणणार आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 belgaum

भाषा आणि संस्कृती कोणत्याही एका प्रांतापुरती मर्यादित ठेवता येत नाही. स्थलांतरामुळे एका भाषेची माणसे दुसऱ्या प्रदेशात जाणारच आहेत. त्यामुळे ज्या प्रदेशात राहायचे आहे, त्या प्रदेशाची भाषा आणि संस्कृती स्वीकारली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यापुढे बोलताना त्यांनी, ‘बेळगाव काय पाकिस्तानमध्ये आहे का? बेळगाव भारतामध्येच आहे,’ असे विधान केले. भारताविषयी आपल्या मनात जितके प्रेम आणि आत्मीयता आहे, तितकेच बेळगावमधील कन्नड भाषिकांविषयीही प्रेम असले पाहिजे, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, आपली मातृभाषा कन्नड होती, आई आणि गावात कन्नड भाषा बोलली जात होती; मात्र महाराष्ट्रात राहायचे असल्यामुळे आपण कन्नड विसरून गेलो आणि आज मराठी लेखक आहोत, असेही त्यांनी सांगितले. ज्या भागात राहतो, त्या भागाची भाषा आणि संस्कृती स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सीमाभागातील मराठी जनतेच्या लढ्याचे काय?

बेळगावसह सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी जनता लढा देत आहे. हा लढा केवळ भाषेपुरता मर्यादित नसून भाषिक अस्मिता, सांस्कृतिक हक्क आणि सीमाप्रश्नाशी संबंधित आहे.

अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडलेली भूमिका आणि बेळगावविषयी केलेली विधाने आता चर्चेचा विषय ठरत आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका अपेक्षित असताना त्यांनी केलेल्या या विधानांवर मराठी भाषिकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.